डहाणु : पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्या मधल्या कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात 20 मे ला जागतिक मधमाशी दिवस निमित्त विशेष मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकड़े वळावं यासाठी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी उपस्थित शेकर-यांना मधमाशी पालनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मधमाशी विषयी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. लखन सिंग म्हणाले की, कोसबाड केंद्र अनेक वर्षापासून मधमाशी संवर्धनाचे काम करत असून या केंद्राची आणि गावाची मधाचे गाव अशी ओळख व्हावी यासाठी भरपूर काम करावे लागेल. येथील शेतकऱ्यांनी मधमाशी पालन केल्यास या मधमाशी पालणातून इथल्या आदिवासी शेतकऱ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होवू शकतील असं ही ते पुढे म्हणाले.
दरम्यान तांत्रिक मार्गदर्शन सत्रात मधमाशी तज्ञ प्रा.उत्तम सहाने यांनी आधुनिक शेतीमध्ये मधमाशीच्या महत्त्वा याविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कृषी भूषण विजय माळी, कृषी भूषण यज्ञेश सावे तसेच कृषिभूषण विनायक बारी यांनी ही आपल्या मार्गदर्शनातून मधू पालकांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आय सी ए आर अटारी पुणे येथील संचालक डॉ.लखन सिंग हे उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विकास जाधव यांनी प्रस्तावना करून पाहुण्याचे स्वागत केले. या कार्यक्रमात उत्कृष्ट मधमाशी पालन करणारे मधुपालक कलू वांगड, राजू मंडळ, मुकेश कडू तसेच शैलेश कलांगडा यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर नुकताच कृषी भूषण पुरस्कार मिळालेले शेतकरी विजय माळी आणि विनायक बारी यांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपाली देशमुख यांनी केलं. तर आभार प्रदर्शन प्रा.अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ अनिलकुमार सिंग, दामिनी तांडेल, प्रशांत वराठा यांनी विशेष परिश्रम घेतले.