पालघर : पालघर जिल्ह्यात काही वर्षांपासून हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळुन येत असल्यानं हत्तीरोगाचं निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत आज पासून पुढील बारा दिवस म्हणजेच 25 मे ते 5 जून पर्यंत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या सामुदायिक औषधोपचार मोहीमेचं उद्घाटन आज विक्रमगड पंचायत समिती मध्ये पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भगवान सांबरे यांच्या हस्ते झालं. त्यांनी स्वत: हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्या घेवुन या सामुदायिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात केली.
जिल्ह्यात ऑक्टोंबर २०२१ मध्ये राबविण्यात आलेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षण (TAS) मोहीमेत ६ ते ७ वर्ष वयोगटातल्या निवडक लहान मुलांच्या तपासणीत डहाणु, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात सर्वाधिक २९ बालके हत्तीरोगानं संक्रमित आढळुन आली आहेत. सन २०१६ ते २०२२ या कालावधितल्या विविध सर्वेक्षणात याच ३ तालुक्यात १४७ व्यक्ती हत्तीरोगानं संक्रमित आढळुन आल्या आहेत. त्यामुळे बालकांचं भवितव्य हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी जिल्ह्यातल्या डहाणु, विक्रमगड आणि तलासरी या तीन तालुक्यात आजपासून या सामुदायिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात झाली. तसचं या तीन तालुक्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं पुढील दोन वर्ष ही सामुदायीक औषधोपचार मोहीम याठिकाणी राबविण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१९ इतके हत्तीरोगाचे रुग्ण आहेत. त्यापैकी वसईमध्ये २६७, पालघर मध्ये १९३, डहाणूमध्ये १३०, तलासरी ७, जव्हार मध्ये ४, मोखाड्यात २, विक्रमगड मध्ये ६, आणि वाडा तालुक्यात १० इतके हत्तीरोगाचे रुग्ण आहेत.
डहाणू विक्रमगड आणि तलासरी या तीन तालुक्यांची लोकसंख्या ८ लाख ४९ हजार ९८४ इतकी असून गर्भवती महिला, अति गंभीर रुग्ण आणि दोन वर्षा खालील बालके वगळता ७ लाख २२,५०० इतके लाभार्थी या मोहिमेसाठी पात्र आहेत. या सामुदायीक औषधोपचार मोहीमे दरम्यान आशा वर्कर, सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीनं घरोघरी कुटुंबातल्या प्रत्येक मुलांना, प्रौढ व्यक्ती आणि वयोवृद्ध या सर्वांना डीईसी आणि अल्बेडॅझॉल या दोन गोळ्या प्रत्यक्ष खाण्यास देण्यात येणार आहे.
एकदा हत्तीरोग बळावल्यास उपाय नाही. मात्र हत्तीरोग होवू नये म्हणून डीईसी आणि अल्बेडॅझॉल या गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा अशी सलग ५ वर्षे घेतल्यास हत्तीरोग होणार नाही असं यावेळी माहिती पालघर जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी सांगितलं.