पालघर : पालघर जिल्ह्यात खरीप हंगामाची सुरुवात होत आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्हा प्रशासनाकडून जिल्हयातल्या सर्व कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. यादरम्यान दोषी असलेल्या २ कृषी सेवा केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसचं एका कृषि सेवा केंद्रास विक्री बंद आदेश देण्यात आला आहे. आणि 11 कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा मिळाल्यानंतर दोषी कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या पालघर जिल्हयातल्या कृषि सेवा केंद्रांमध्ये 1029 मे. टन एवढा युरिया खताचा साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे. या उपलब्ध साठयाची विक्री कृषि खात्याच्या अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीतच करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार संरक्षित साठा म्हणून उपलब्ध असलेल्या 771 मे. टन साठयातील युरिया हा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
त्यामुळे पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खत उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्या येत आहे. आणि जर खते, बियाणे व किटकनाशके विक्री संदर्भात कोणाची तक्रार असेल तर त्यांनी 9403821870 या संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केलं आहे.