पालघर : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ‘माझा वाढदिवस, माझी भेटवस्तू’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पालघरमधील शासकीय शाळा, आश्रमशाळा आणि दुर्गम भागातील शैक्षणिक साहित्याची निकड असलेल्या गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू, शालेय साहित्य तसेच कपडे महाविद्यालयात देण्याची संकल्पना ‘माझा वाढदिवस, माझी भेटवस्तू’ हा उपक्रम मांडतो. या उपक्रमाचे समन्वयक प्रा. विवेक कुडू आहेत. महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर कोणीही नागरिक या उपक्रमाअंतर्गत भेटवस्तू रुपातील मदत महाविद्यालयाकडे जमा करु शकतील. या वस्तू दिल्यानंतर त्यांचा हिशोब तसेच त्या कोणत्या आणि किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या याची सर्व नोंद महाविद्यालयात ठेवली जात आहे. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी महाविद्यालयाकडे शालेय साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू, खेळाचे साहित्य जमा केले आहे. जमा झालेले सर्व साहित्य महिन्यातील एका विशिष्ट तारखेला शिक्षक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत ग्रामीण आणि दूर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करताना त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये राष्ट्रीयत्वाचे धडे गिरविण्यास सहाय्यभूत ठरणारा आणि आपल्या वाढदिवसाला दुसऱ्याला मदत करण्याची संधी देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना समाधान देणारा असेल, असे मत सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केले. उपरोक्त नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी पाठीशी असेल असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांनी दिले आहे.