पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि तिची हत्या करून फरार झालेल्या दोन तरुणांना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीची हत्येची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुलीच्या वडिलांचं म्हणनं होत की, कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी दगडानं ठेचुन माझ्या मुलीची हत्या केली. आणि तिचा मृतदेह जव्हार मधल्या जामसर गावच्या हद्दीतल्या तांबडमाल इथल्या शेत जमीनीतल्या एका नालीमध्ये फेकून ते फरार झाले.
मुलीच्या वडिलांनी अशी तक्रार दाखल केल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटिल, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली पथकं या गुन्ह्याच्या तपासाला लागली. या घटनेचा तपास करणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक आशीष पाटिल यांच्या टीमनं घटनास्थळाचं निरिक्षण केल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडे आणि या मृत अल्पवयीन मुलीसोबत गावातचं एका बांधकामाच्या ठिकाणी मजूरीवर जात असलेल्या 14 स्त्री-पुरुषांकड़े चौकशी केली. आणि त्या आधारे पोलिसांनी दोन संशयित तरुणाना ताब्यात घेतलं. आणि त्यांची कसून चौकशी केली असता या घटनेचं सत्य समोर आलं.
पोलिसांना चौकशी दरम्यान या आरोपींनी सांगितलं की, ती मुलगी तिच्या शेतातील आंब्याच्या वाडी राखण्यासाठी गेली असताना आम्ही तीचा पाठलाग करून तिला एकांतात गाठून तिच्यावर जबरदस्तीनं अतिप्रसंग केला. आणि ही बाब ती आपल्या नातेवाईकांना सांगेल तर सत्य समोर येईल आणि आपली गावामध्ये बदनामी होईल म्हणून या दोन्ही आरोपींनी दगडाने ठेचुन तिची हत्या केली. आणि तिचा मृतदेह नालीमध्ये टाकुन ते फरार झाले.