पालघर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पालघर पोलीस दलाकडून आज 10 किलोमीटरच्या अमृतमहोत्सवी दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. या अमृतमहोत्सवी दौडमध्ये शासकीय अधिकारी आणि अंमलदार, शाळेतील विद्यार्थी, एनस.सी.सी. विद्यार्थी, नागरीक अशा जवळपास ७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही दौड पोलीस अधीक्षक कार्यालय येथून चाररस्ता ते पालघर रेल्वे स्टेशन, माहिम वळण नाका आणि परत चाररस्ता मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे समाप्त करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी आणि अंमलदार तसचं नागरीकांनी सहभाग घेऊन १० किलोमीटरची दौड यशस्वीपणे पुर्ण केली. यावेळी विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली.