लेख – आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची आपण किती काळजी घेतो? हा प्रश्न एकदा स्वत:लाच विचारून पाहा. घरातील लहान मुलांशी आपण आवर्जून गप्पा मारतो. आज तु शाळेत काय गंमत केलीस असे त्यांना आवर्जुन विचारले जाते. पण त्याच घरातील वृद्धांची साधी विचारपूसही होत नसते. त्यांच्याशीदेखील कधीतरी मनमोकळ्या गप्पा मारून बघा. त्यांच्या खुप लहान अपेक्षा असतात. त्या अपेक्षा त्यांच्या नकळत आपण पूर्ण केल्या तर त्यांना किती आनंद होईल याची कल्पना देखील आपण करुन शकत नाही. तुमची एखादी जुनी आठवणही ते तुम्हाला सांगतील. कारण हा काळ त्यांच्यासाठी तसा आठवणीत रमण्यासारखाच असतो. वृद्धत्वाच्या प्रवासातही प्रकृती स्वास्थ्यानुसार वेगवेगळे टप्पे येतात.
त्यातून अनेक प्रकारच्या कौटुंबिक व सामाजिक गरजा निर्माण होतात. या प्रवासात आपली काळजी घेणारी व्यक्ती जवळ असणं, निदान हाकेच्या अंतरावर असणं, ही प्रत्येकाचीच मानसिक गरज असते. माणसाला प्रत्येक वयात साथ-सोबतीची गरज असते, पण वाढत्या वयासोबत नातेसंबंधांची निवृत्ती ही एकप्रकारे लादलीच जाते. पुर्वीच्या काळी घरातील सर्व महत्वाचे निर्णय हे घरातील वृद्धच घ्यायचे. त्यांना एक मान असायचा. घरातील सदस्यांना त्यांची आदरयुक्त भीतीही असायची. परंतु आज कुटुंबसंस्थेच्या बदलत्या रूपांमुळे, वेगवेगळ्या जीवनशैलींमुळे कुटुंबांतर्गत बदल होताहेत किंवा पर्यायी कुटुंब सदृश व्यवस्था आकाराला येत आहेत.
या नव्या व्यवस्थेत मायेचा, आपुलकीचा ओलावा शोधत नवे नातेसंबंध बनताहेत. विभक्त कुटुंबपद्धती आपल्या संस्कृतीत रुजू लागल्यापासून घरातील सगळी सूत्र ही कुटुंबातील कमवत्या तरुण मंडळींच्या हाती आली. त्यानंतर घरातील आजीआजोबा हे नावापुरतेच उरले, काही घरात त्यांची रवानगी गावाला करण्यात आली तर काहींनी तर त्यांना थेट वृद्धाश्रमात पाठवले.
म्हातारपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बालपण असते असे म्हणतात. बहुतांशवेळा हे मनाला पटतेदेखील! सुरकुत्या पडलेली ती त्वचा, धूसर झालेली नजर आणि कानाला कमी ऐकू येत असले तरीदेखील सर्व काही जाणणारी ही मंडळी घराघरात असतात. आपल्या नातवंडांसाठी जणू काही ते देवाकडून आपल्या वाट्याचेही दीर्घायुष्य मागत असतात. घरातील सर्वांनी हसत-खेळत, सुखी, आनंदी राहावे असे त्यांना वाटत असते.
भारतात दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व आयुर्वर्धमान तंत्रांमुळे म्हातार्याी माणसांची संख्या वाढत आहे. सध्या भारतात 90 दशलक्ष वृद्ध व्यक्ती असून पुढील दशकात त्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यातील 40% वृध्द हे दारिद्र्य रेषेखाली आहेत, तर 70% अशिक्षित आहेत किंवा शारीरिक श्रमांतून मिळणार्या् उत्पन्नावर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर वृद्ध व्यक्तींचे हक्क, त्यांच्या समस्या व त्यांच्यावरील अत्याचाराविषयी जागृती निर्माण होणे व त्यांना निरोगी, सुदृढ व आनंददायी आयुष्य जगण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे हे येत्या काळातील मोठे आव्हान ठरणार आहे.
कुटुंबसंस्थेच्या पारंपरिक साच्यात आधुनिक काळात झालेले बदल लक्षात घेता कुटुंबातील वृद्धाचे स्थान व त्यांची देखभाल हे आता अडचणीचे ठरू लागले आहे ह्याचा पुरावा आपल्याला सध्याची परिस्थिती देते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत वृध्दांची काळजी घेणे अजूनही कठीण झाले आहे. वृध्दांना कोरोनाची लागण झाली तर त्यातून बरे होण्याचे वृध्दांचे प्रमाण खुपच कमी आहे. वयोमनानूसार जडलेल्या इतर व्याधींमुळे अधीच शरीर थकलेले त्यात अपूऱ्या रोगप्रतीकार शक्तीमुळे त्यांना कोरोनाचा सामना करण्यास खूप अडचणी येतात. जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा अहवाल पाहिला तर त्यात वृध्दांची संख्या जास्त आढळून येते.
मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून महाराष्ट्रात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत अहे. या मोहिमेच्या शिर्षकातच मोहिमेचा संपूर्ण अर्थ स्पष्ट होतो. माझ्या कुटुंबावर येणाऱ्या संकटातून कुटुंबाचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. कुटुंब या शब्दाचा अर्थ माझा परिवार, माझा समाज, माझे गाव, माझे राज्य, माझा देश, माझे जग असा होतो. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तर कोरोना रुपी राक्षसाचा नायनाट होण्यास वेळ लागणार नाही. सध्याच्या काळात तरुण पीढीने गाफील न राहता आपल्या कुटुंबातील वृध्द/जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. अद्यापही तरुण वर्ग मी सुदृढ आहे.
माझी रोगप्रतीकार शक्ती चांगली आहे. मी दररोज व्यायाम करतो म्हणून मला काही होणार नाही. या भ्रमात वावरत आहेत. त्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की, जरी आपण या रोगाचा मुकाबला करु शकत असलो तरी आपल्यामुळे वृध्दांना याची बाधा झाली तर ते या रोगाचा मुकाबला करण्यात असमर्थ ठरतील.
भारतात वृध्दांवरील होणारे हल्ले, अत्याचार यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिथे विश्वासाचे नाते / अपेक्षा असते त्याला तडा जाणारी व वारंवार घडणारी कृती, ज्यामुळे वृद्ध व्यक्तीस शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक इजा अथवा दु:ख होते त्याला वृद्ध व्यक्तीवर होणारा अत्याचार असे म्हणता येईल. हे अत्याचार गरीब मध्यम वर्गीय, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित कोणत्याही धर्म जातींत घडू शकतात व घडत असतात.
अनेकदा तीर्थक्षेत्री, मोठ्या शहरांमध्ये अगर वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना सरळ सोडून दिले जाते. किंवा त्यांच्याशी असलेला सर्व संपर्क तोडण्यात येतो. त्यांना घराबाहेर हाकलले जाते, किंवा अडगळीच्या जागेत डांबले जाते. शहरांत, खेड्यांत सर्रास आढळणारे हे प्रकार आहेत. वृद्धांवर विविध प्रकारे अत्याचार केले जातात हे अत्याचार म्हणजे शारीरिक छळ, मानसिक / भावनिक छळ (ह्यात शिवीगाळ होण्याचाही अंतर्भाव), आर्थिक स्वरूपाचे / वस्तूंशी निगडित शोषण, दुर्लक्ष, लैंगिक छळ, वृद्ध व्यक्तीचा त्याग करणे. जास्तीत जास्त वृद्ध हे आर्थिक दृष्ट्या परावलंबी आहेत.
अनादर, दुर्लक्ष, आर्थिक शोषण, शिवीगाळ यापैकी कोणता ना कोणता अत्याचाराचा प्रकार या वृद्धांनी सोसला असतो. काही वृद्ध भावनिक आधार व मूलभूत सोयींच्या अभावापायी अत्याचाराचे बळी ठरतात. आपण दुर्लक्षित आहोत, आपले कुटुंबिय कामात किंवा त्यांच्या व्यापांत व्यस्त आहेत व त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे त्यांना वाटते. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध काही बोलण्यास ते राजी होत नाहीत, कारण त्यांना आपल्यावर अत्याचार होत आहेत ह्याचीच जाणीव नसते आणि त्यांनी काही भूमिका घेतली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही ही भीती त्यांना सतत वाटत राहते. तसेच समाज काय म्हणेल ह्याची भीती व भविष्यात आणखी अत्याचार सहन करावे लागतील ह्याची भीती. ह्या सर्वांमुळेही अत्याचार ग्रस्त व्यक्ती त्याविरोधात काही करु शकत नाही.
अत्याचार करणारे लोक घरातीलच असतात. मुलगा, सून, मुलगी, जावई इत्यादी. अत्याचार होण्याचे कारण प्रॉपर्टी विषयक वाद, मतभेद इत्यादी असते. यासर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी समाजाने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वृद्धांना नियमित व पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक, कुटुंबियांशी तडजोड / मतभेद मिटविणे, आर्थिक परावलंबित्व टाळण्यासाठी स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी बाळगणे, मानसिक आधार, मदत ह्यासाठी आवश्यकतेनुसार वृद्धांचे व कुटुंबियांचे समुपदेशन या गोष्टी होणे गरजेचे आहे.
आज संपूर्ण जगात वृध्दांच्या मदतीसाठी भरपूर मदत संस्था / संघटना कार्यरत आहेत. हेल्पेएज इंडिया, हार्मनी इंडिया, सिलव्हर इनिंग्ज सारख्या संस्था /संघटना वृध्दांसाठी काम करातात. अशा संस्था विविध प्रकारची कामे कामे करत राहतात उदा. वृद्धाश्रमांची माहिती देणे. तसेच परवडणार्या वृद्धाश्रमात प्रवेशासाठी मदत करणे. वृद्धांना कायदेशीर बाबींमध्ये मदत करणे. अत्याचार रोखण्यासाठी घरी भेट देणे, मदत करणे. वैद्यकीय देखभाल करणारी व्यक्ती / केअर टेकर मिळविण्यासाठी मदत करणे. वृद्धांचे हक्क, त्यांच्याविषयीच्या सरकारी योजना, कार्यक्रम, मदत सुविधा, मदत संस्था इत्यादींविषयी जागृती करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण कुटूंब म्हणून विचार करतो तेव्हा वृध्द देखील आपल्या कुटूंबाचे घटक असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. आजच्या या कठीण काळात ‘कुटूंब’ ही संज्ञा व्यापक अर्थाने आहे. वृध्दांनाही यात सामील करून घ्या एवढेच या निमित्ताने.
प्रविण डोंगरदिवे
माहिती सहाय्यक
विभागीय माहिती कार्यालय
कोकण विभाग, नवी मुंबई