पालघर : रूरल ऑन्ग्रेप्रेनर्स वेल्फेअर फाऊंडेशन तर्फे पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी मध्ये संस्कृती आणि विविध कलांच्या रंगाची उधळण करणाऱ्या चिकू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं हे चिकू फेस्टिवलचं नववं वर्षं आहे. 18 आणि 19 फेब्रुवारी असे दोन दिवस बोर्डी समुद्रकिनारी हा चिकू महोत्सव होत असून आज या महोत्सवाचा दुसरा दिवस आहे. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि NKCCA यांच्या सहकार्यानं या चिकू महोत्सव २०२३ चं आयोजन करण्यात आलं आहे.
पालघर जिल्ह्याला समृद्ध समुद्रकिनारा लाभला असून याच समुद्रकिना-या लगत वसलेल्या बोर्डीचा परिसर हा चिकूसाठी सुप्रसिद्ध आहे. आणि याच निसर्गरम्य बोर्डीच्या समुद्रकिनारी एस्. आर. सावे कॅम्पिंग मैदानात यंदा या नवव्या भव्य चिकू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यंदाच्या या चिकू महोत्सवाची थीम ही वोकल फॉर लोकल ही आहे. या महोत्सवात वारली पेंटिंग्स, आदिवासिंच्या परंपरा आणि संस्कृती यांचं दर्शन घडवून आणणा-या विविध कलाकृती, टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेचा वापर करत नारळापासून तयार केलेल्या अतिशय सुबक अशा वस्तू, मूर्ती कलाकारांच्या पर्दर्शनी, चिकू या फळापासून तयार केलेल्या वस्तू, विविध कलाकुसरीच्या वस्तू, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असे जवळपास २१० स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यासोबतचं महोत्सवाचा आनंद घेणार्या नागरिकांसाठी आदिवासी संस्कृतीचे पारंपरिक तारपा नृत्य, पपेट शो, मेट्रो मॅजिक यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी तसचं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन इथं करण्यात आलं आहे.
व्र्टिकल क्रॅब फार्मिंग करून मिळवतोय लाखोंचं उत्पन्न
या चिकू महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पालघर जिल्ह्यासह मुंबई आणि गुजरात राज्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातच शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी हा महोत्सव असल्यानं नागरिक आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारांसह या महोत्सवाचा आनंद लुटत आहेत.