पालघर : सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या तिसऱ्या चरणा अंतर्गत मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी आज अन्य केंद्रीय मंत्र्यासह पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथं धी सातपाटी फिशरमेन्स सर्वोदय सहकारी संस्थेच्या प्रांगणात मच्छिमार बांधवांशी संवाद साधला. तसचं त्यानंतर रात्री त्यांनी वसई मधल्या पाचूबंदर इथं वसई मच्छिमार सहकारी संस्थेच्या प्रांगणात मच्छिमारांशी संवाद साधला.
दरम्यान यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, भारत सरकारचे मत्स्यव्यवसाय सचिव, महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय सचिव, राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड, महाराष्ट्र सरकार, भारतीय मत्सिकी सर्वेक्षण, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, मनिषा चौधरी आदी उपस्थित होते.
देशात पहिल्यांदा मच्छिमारांसाठी देखील किसान क्रेडिट कार्ड सारखी योजना सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याचा हा मोदींचा मोठा निर्णय आहे.केसीसी चा यांना जो लाभ मिळायला हवा तेवढा मिळत नाहीये. महाराष्ट्र सरकारनं आपल्या देखरेखीत ४० हजार अर्जातून ११ हजार लोकांना केसीसी मिळालं आहे. उर्वरित ज्या लोकांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांना लवकरात लवकर निकाली लावण्यासाठी प्रयत्न करू असं वसईच्या मच्छिमारांशी संवास साधताणा रुपाला म्हणाले. मत्स्य संपदा साठवणूक करणे आणि वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत असून पहिल्यांदाच या योजनेसाठी प्रधानमंत्री मोदी यांनी २० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रुपाला यांनी पालघर मधल्या सातपाटी इथं मच्छिमारांशी संवाद साधताना दिली.
यावेळी रुपाला यांच्या हस्ते पाचूबंदर इथं सागर परिक्रमा गीताचं उद्घाटन करण्यात आलं. तसचं ई श्रम कार्ड, प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी, आधार कार्ड क्यू आर कोड आदींच्या प्रमाणपत्रांचे वाटप देखील यावेळी रुपाला यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक मच्छिमारांनी आपल्या विविध समस्या आणि त्या बाबतचे पत्र त्यांना दिले.यावेळी वसई मधल्या पाचूबंदर इथं आयोजित कार्यक्रमात विविध कोळीगीतांवर कोळी नृत्य सादर केली. या कोळी नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून आजाद का अमृत महोत्सव याचा एक भाग म्हणून ही सागर परिक्रमा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सागर परिक्रमा यात्रेच्या तिसऱ्या चरणाला पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथून आज सुरुवात झाली.