पालघर : तरुणांकडून शेतीत घडून येणारे नवनवीन प्रयोग पाहता आजच्या काळात युवा तरुण आणि शेतीतले नवनवे प्रयोग याचं नातं काहीसं जवळचं होत चाललेलं दिसून येतं. आजचे युवा तरुण हे आपल्या वडीलोपार्जित शेतीत काही तरी नवीन आणि यशस्वी प्रयोग करताना आपल्याला नेहमीचं दिसून येतात. असाचं काहीसा अनोखा आणि नवा प्रयोग पालघर जिल्ह्यातल्या एका शेतकरी तरुणाने यशस्वी करून दाखवला आहे.
पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्या मधल्या भूईगाव या गावात राहणा-या विकास वझे या शेतकरी तरुणाने आपल्या वडीलोपार्जित शेतीत पारंपरिक शेतीला जोड देत व्हर्टिकल क्रॅब फार्मिंगचा म्हणजेच खेकड्याचा शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. खेकड्याचा शेतीचा पालघर जिल्ह्यातला हा पहिलाचं प्रयोग आहे. विशेष म्हणजे ही खेकडयाची शेती एखाद्या तळ्यात केलेली नसून ती एका उभ्या पद्धतीच्या बॉक्सेस मध्ये करण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ ……
कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन मध्ये हाताला कामधंदे नसताना घरबसल्या काहीतरी कामधंदा सुरुकरून दोन पैसे कसे कमवता येतील या गोष्टीचा विचार करत असताना विकास यांना व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग करण्याची कल्पना सुचली. त्यांनी विविध ठिकाणांहुन या शेतीविषयी अगोदर माहिती जाणूण घेतली. आणि मग त्यांनी रत्नागिरीच्या एका फिशरी कॉलेज मधून या खेकड्याच्या शेतीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर विकास यांनी आपल्या शेतात एका गुंठ्याच्या जागेत हा व्हर्टिकल बीइंग क्रॅब फार्मिंगचा प्रयोग सुरु केला. या खेकड्याच्या शेतीसाठी लागणारं काही साहित्य हे त्यांनी थायलंडवरुन मागवलं. आणि या शेतीसाठी लागणारे खेकडे हे कोकणातल्या विविध भागांतून आणि गुजरात राज्यातून मागवण्यास त्यांनी सुरुवात केली. विकास यांना ही शेती करण्यासाठी सुरुवातीला 20 ते 22 लाख रुपयांचा खर्च आला.
या शेतीत विकास हे लाल पाठीचा खेकडा आणि हिरव्या पाठीचा खेकडा अश्या दोन प्रकारच्या जातीच्या खेकडयांची शेती करतात. त्यांच्या या प्रोजेक्ट मध्ये एका वेळेस जवळपास एक हजार खेकडे शेतीसाठी ठेवण्याची क्षमता असलेले बॉक्सेस आहेत. त्यातल्या प्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येकी एक खेकडा ठेवण्यात येतो. ज्याचं वजन हे अर्धा किलो ते एक किलो पर्यंतचं असतं. खा-या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी रिसायकल करून या खेकडयांच्या शेतीसाठी वापरलं जातं.
पालघर जिल्ह्यात, मुंबईच्या बाजारपेठेत तसचं भारताच्या विविध भागांमध्ये ही त्यांच्या खेकडयांना मोठी मागणी आहे. बऱ्याच व्यापा-यांमार्फत त्यांचे हे खेकडे विविध ठिकाणी एक्सपोर्ट होतात. त्यांच्या शेतीतील खेकडयांना मोठी मागणी असल्यानं या शेतीतुन खर्च वगळता चांगला नफा मिळत असल्याचं विकास वझे सांगतात. मोठ्याप्रमाणात शिक्षण घेवुन सतत केवळ नोकरीच्या शोधात फिरणा-या तरुणांसमोर विकास वझे या तरुण शेतक-यानं आपल्या शेतजमीनीत खेकडयांच्या शेतीचा पहिला आणि अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे.