पालघर : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तुत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि पालघर जिल्ह्यातल्या महिलांना एकाच मंचाखाली एकत्रित आणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच स्त्रीरंग या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मध्ये महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, डहाणू नगरपालिका आणि तलासरी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं डहाणू समुद्रकिनारी सी व्ह्यू पार्क इथं २५ आणि २६ मार्चला हा स्त्रीरंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम शासनाच्या महिला सबलीकरणाच्या तत्वाशी दुवा साधणारा असून या सोहळ्यात पालघर, डहाणू आणि आसपासच्या परिसरातल्या यशस्वी महिलांचा त्यांनी समाज आणि आपल्या क्षेत्राला दिलेल्या योगदानासाठी गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्त्रियांना त्यांनी बनविलेल्या पाककृती आणि कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवता याव्यात यासाठी १०० हून अधिक स्टॉल्स देखील लावण्यात येणार आहेत.त्यामुळे या दोन दिवसीय कार्यक्रमात महिलांना व्यवसायाची सुवर्ण संधी देखील प्राप्त होणार आहे. महिलांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी इथे नृत्य, संगीत आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम ही आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर महिलांमध्ये फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्याविषयी जागरुकता आणण्यासाठी स्पर्धात्मक खेळ आणि झुम्बा, योगा आणि स्व-संरक्षण यांसारख्या उत्साहपूर्ण कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या स्त्रीरंग सोहळ्यातून स्त्रियांना नवीन ज्ञान मिळविता येईल, मनोरंजनाचा आनंद घेता येईल, एकमेकांशी चांगल्या प्रकारे जोडलं जाता येईल आणि आपले करिअर, व्यवसाय आणि एकूणच आपला दृष्टिकोन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाता येईल. गृहिणी असो वा बिझनेस वुमन असो किंवा करिअर करणारी स्त्री असो इथे प्रत्येकीसाठीच काही ना काही असणार आहे. एकुणचं स्त्रीरंग हा कार्यक्रम महिलांसाठी आनंद आणि शिक्षण यांची एक परिपूर्ण भेट ठरणार आहे.