पालघर : सेवा विवेक या संस्थेकडून पालघर जिल्ह्यातल्या काही ग्रामीण भागांतल्या महिलांना बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण देण्यात येतं. सध्या जिल्ह्यातल्या दुर्वेश-देसकपाडा या गावात १७ व्या तुकडीला बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. ३० दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात जवळपास ४० आदिवासी महिला सहभागी झाल्या आहेत. इथल्या प्रशिक्षण वर्गाला कुशल बांबू हस्तकला शिकलेल्या सेवा विवेक संस्थेतल्या महीलांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
ग्रामपातळीवर बांबू ग्रामोद्योग उत्पादनाच्या माध्यमातून पालघर जिल्हातल्या ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं बांबूपासून अनेक आकर्षक वस्तू तयार करण्यात येत आहेत. या उद्योगासाठी गेल्या काही वर्षांपासून पालघर जिल्हातल्या आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे आदिवासी महिला बांबूपासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात कुशल झाल्या आहेत. जिल्ह्यात बांबूपासून सध्या राखी, पेन होल्डर, मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर जॉइंट ट्रे, कंदील, बांबू ट्रॉफी यासारख्या ४० हुन अधिक बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार होत आहेत. आणि उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे या वस्तूंना चांगली मागणी येत आहे. त्यामुळे या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातल्या आदिवासी महिलांच्या रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरीचं रोजची कामं सांभाळून फावल्या वेळेत बांबू हस्तककलेचं काम करून रोजगाराची संधी मिळत आहे.