मुंबई : राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार आणि गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुर करण्याचा निर्णय १४ फेब्रुवारी २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet Decision) घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
राज्यात आणि देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांसाठी पहिल्या चार वर्षांसाठी 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रत्येक वर्षी 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.
नंदुरबार आणि गोंदिया येथील परिचर्या महाविद्यालयांसाठी “Scheme for augmenting Nursing Education- Establishment of new Colleges of Nursing (CON) in co-location with Medical Colleges” या केंद्राच्या योजनेत प्रत्येक परिचर्या महाविद्यालयासाठी १० कोटी इतका निधी देण्यात येईल. त्यापैकी केंद्रशासन ६० टक्क्या प्रमाणे ६ कोटी आणि राज्यशासन ४० टक्क्या प्रमाणे ४ कोटी निधी देणार आहे. बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ आणि दैनंदिन आवर्ती खर्च आदी साठी प्रति परिचर्या महाविद्यालयासाठी 32 कोटी 97 लाख रुपये इतका निधी आवश्यक असून या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.
जळगांव, लातूर, बारामती आणि सांगली (मिरज) या परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ आणि दैनंदिन आवर्ती खर्च आदी साठी अंदाजे 107 कोटी 94 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील.