पालघर : सध्या पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, मोखाडा, वाडा,विक्रमगड यासंह अनेक भागात पाणी टंचाईची समस्या आ-वासून आहे. बोईसर शहरालगत असलेल्या काही गावांमध्ये बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावल्यानं त्यातलं पाणी आटलं गेलं आहे. त्यामुळे नागरिकांना एमआयडीसी कडून एक किंवा दोन दिवसा आड रात्री अपरात्री एखाद तास येणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही.
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांची तहान भागवणाऱ्या विक्रमगडलाही सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. हाकेच्या अंतरावर धरण असताना देखील सारशी इथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. वारंवार ग्रामपंचायतीकडे मागणी करून देखील ग्रामपंचायत कोणत्याही उपाययोजना करत नसल्याने इथल्या ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
पालघरच्या विक्रमगड मधल्या सारशी या ग्रामपंचायत हद्दीतल्या गावकऱ्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात असलेल्या विहिरी आणि बोरवेल यांनी तळ गाठला असल्यानं पाण्यासाठी येथील महिलांना रात्रभर विहिरी भोवती पहारा द्यावा लागतो. तरीही पुरेस पाणी मिळत नाही. आणि जरी थोड फार पाणी मिळालं देखील तरी ते दूषित मिळत. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. सारशी ग्रामपंचायत हद्दीतल्या गावपाड्यांमध्ये तीन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असून गावातल्या सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच गावात यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली नळपाणी योजना ही बंद असल्यानं इथल्या महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागतेय.
पाणी टंचाईची भीषणता सहन करणार हे सारशी गाव धामणी आणि कवडास या धरणांपासून अवघ्या काही अंतरावर आहे. याच सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही धरणांमधून पालघरच्या पूर्व भागासह बोईसर, तारापूर एमआयडीसी, वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र असं असताना देखील इथल्या स्थानिक नागरिकांना दरवर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मागील कित्येक आठवड्यापासून इथल्या महिला पाण्यासाठी वणवण करत असतानाही प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पालघरच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात विक्रमी पावसाची नोंद होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या आणि सरकारच्या नियोजनातल्या अभावामुळे काही महिन्यातच इथल्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने इथली पाण्याची समस्या कायमची मिटेल अशा उपाययोजना करण गरजेच आहे. मात्र याबाबत प्रशासनाला कधी जाग येईल हाच खरा प्रश्न आहे.