पालघर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया कडून दरवर्षी तालुका,जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर शासकीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या मध्ये शासन मान्य आणि संघटना मान्य अशा ९३ खेळांचा सहभाग असतो. यात दरवर्षी सर्वात जास्त क्रीडा प्रकारात सहभाग घेणा-या कनिष्ठ महाविद्यालयांपैकी सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय हे मुंबई विभागा अंतर्गत येणा-या १३ जिल्ह्यातलं प्रथम क्रमांकाचं महाविद्यालय आहे.
शासनाच्या क्रीडा विकास धोरणात्मक कार्यक्रमाचा भाग म्हणून ज्या शाळा महाविद्यालय जिल्हास्तरावर सर्वात जास्त विजय संपन्न करतात, अशा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वयोगट निहाय प्रोत्साहन निधी दिला जातो.
२०२२-२३,२०२३-२४ साली झालेल्या स्पर्धेत सलग दोन्ही वर्षी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयानं प्रथम क्रमांक मिळवला आहे. ह्या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातल्या १००० शाळा – कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभागी होत जवळपास ३५,८४१ खेळाडूंनी जिल्ह्यातून सहभाग घेतला होता. त्यात सलग दोन वर्षे अव्वल राहण्याचा मान दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयानं मिळविला आहे.
गेल्या वर्षाच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी अत्यंत नैपुण्यपूर्ण खेळ करत १०२ गुणांच्या फरकानं सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयानं प्रथम क्रमांक मिळवला आहे.