पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन सणानिमित्त महिला, मुली आपल्या भावांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या, कोणी सोन्याच्या तर कोणी चांदीच्या राख्या विकत घेत असतात. मात्र अशात पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या महिला पर्यावरण पूरक अशा बांबूच्या राख्यां बनवण्यावर भर देत आहेत. यंदा या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूच्या राख्या या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे या राख्यां मधून वृक्ष लागवड देखील होणार आहे.
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या टेटवाली, वाकी, जांभा, विळशेत, नडगेपाडा, वाणीपाडा आणि गरदवाडी या सात गावातल्या जवळपास 150 महिला आणि पुरुषांनी मिळून यंदा 35 हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत. या टीम मध्ये 130 महिला आणि 20 पुरुषांचा समावेश आहे. यंदा या बचत गटांच्या महिलांनी चार प्रकारच्या राख्या तयार केल्या आहेत. त्यामध्ये अयोध्या, कलश, सुमन आणि वक्रतुंड या चार प्रकारच्या राख्यांचा समावेश आहे. या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी मेस जातीच्या बांबूचा वापर केला आहे. जो विक्रमगड भागात आणि आसपासच्या परिसरात सहजासहजी उपलब्ध होतो.
या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या राख्यांचं विशेषत्व म्हणजे या राख्या बांबू पासून तयार केल्या असल्यामुळे त्या पर्यावरण पूरक तर आहेतचं, पण त्याचबरोबर या राख्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड देखील होणार आहे. या राख्या ज्या पांढ-या कागदावर पॅक करण्यात आल्या आहेत, त्या पेपरला तुळशीच्या बिया टाकून तयार करण्यात आलं आहे. जेणकरून हा कागद जिथे कुठे टाकला जाईल त्या ठिकाणी तो मातीत मिसळून त्यातून तुळशीचं रोप तयार होईल.
आसाम, वेस्ट बंगाल, गोहाटी, अरुणाचल प्रदेश यासारख्या भागात नेव्ही च्या सैनिकांसाठी तसचं देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी या पर्यावरणपूरक अशा बांबूच्या राख्या पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रक्षाबंधनला भारतीय सैनिकांच्या हातावर पालघरच्या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या सुंदर आणि बारीक नक्षीकाम असलेल्या राख्या झळकणार आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यासह हैद्राबाद, जालना, मुंबई या सारख्या विविध ठिकाणी या राख्या विक्रीसाठी पाठवण्यात गेल्या आहेत. या एका राखीची किंमत बाजारात 35 रुपये इतकी आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात भात शेतीची कामं सुरू आहेत. त्यामुळे महिला वर्ग शेतीच्या कामात गुंतलेला आहे. मग अशात महिला वर्ग आपल्या घरची, शेतीची कामं आटोपून उरलेल्या दिवसाच्या काही तासांच्या वेळेत आणि रात्री काही वेळ जागून या राख्या बनवण्याचं काम करत होत्या. त्यातून त्यांना आर्थिक मदत होत आहे. केशव सृष्टी सारख्या संस्थेने या तालुक्यातल्या महिलांना त्यांच्याच गावात रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिल्यानं इथला महिला वर्ग आता सक्षम होवू लागला आहे. आता इथल्या महिलांनी केशव सृष्टी या संस्थेच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या सहकार्याने विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर प्रा.लि या नावाने कंपनी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून बांबू हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करून त्यातून आर्थिक उत्पन्न त्या मिळवत आहेत.