पुणे : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे महायुतीतल्या काही नेत्यांनी हार न मानता कंबर कसून कामाला सुरूवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात विधानसभेच्या जागा वाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. मात्र, असं असतानाच गेल्या काही दिवसांपासून सर्वच पक्षांमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. त्यात जागांवरून चुरस बघायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबात बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील काही भागात त्यांचे प्राबल्य चांगले आहे. त्यात ठाणे, कल्याण हा शिंदे गटाचा बालेकिल्ला आहे. तर पुण्यात खडकवासला, अहमदनगर शहर, शिर्डी, औरंगाबाद येथे ही शिंदे गटाचे प्राबल्य आहे. या शिवसेनेच्या हक्काच्या जागा आहेत.
पुण्यातील खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कॉग्रेसही निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. शिवसेनेचे रमेश कोंडे यांचे मतदार संघात चांगले प्राबल्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोंडे यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचे समजते. त्यामुळे कोंडे अधिक जोमाने काम करत आहेत. कोंडे यांना तिकिट मिळाले तर शिवसेना खडकवासला येथे बाजी मारू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.