पालघर : गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात हार, फुले, केळीचे खांब आणि इतर साहित्य यासारखं निर्माल्य तयार होत असतं. हे निर्माल्य तलावात, समुद्रात, नदी आणि जवळपासच्या खाड्या यासारख्या विविध जल स्त्रोतांमध्ये टाकून दिलं जातं. जल स्त्रोतांमध्ये हे निर्माल्य टाकल्यानं ते पाण्यात कुजलं जातं आणि त्यामुळे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होतात. हे सर्व टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात विसर्जना दरम्यान टाकल्या जाणा-या निर्माल्याचं संकलन करून त्या टाकाऊ निर्माल्यातून टिकाऊ अशा खताची निर्मिती करण्याचा अनोखा प्रयोग पालघर जिल्ह्यातल्या काही महिला बचत गटांनी सुरु केला आहे.
हेही वाचा : वर्षाला 4650 तरुण होणार प्रशिक्षित
पालघर जिल्ह्यातल्या वसई–विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात यंदा गणेशोत्सव काळात 32 हजार किलो पेक्षा जास्त निर्माल्य संकलित करण्यात आलं. त्यानंतर हे संकलित केलेलं निर्माल्य या बचत गटाच्या महिलांनी आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या उद्यानात आणून तिथे खत तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. वसई विरार शहरात विविध ठिकाणी ८ बचत गटाच्या ५७ महिलांनी निर्माल्यातून खतनिर्मितीचा हा अनोखा प्रयोग सुरु केला आहे. काही महिला बचत हे निर्माल्यापासून गांडूळ खत, काही कंपोस्ट खत, काही कंपोस्ट आणि गांडूळ खत अशी दोन्ही खते, काही निर्माल्यातल्या टाकाऊ वस्तूंपासून विविध गृहोपयोगी वस्तू तर काही बचत गट या निर्माल्यातून वापरायोग्य अशी ज्वेलरी तयार करत आहेत.
महापालिकेच्या स्वच्छता दूतांकडून अगोदर या बचत गटातल्या महिलांना खत निर्मितीचं आणि वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर प्रशिक्षण मिळवलेल्या बचत गटाच्या महिलांनी महापालिकेच्या तलावाच्या ठिकाणी या निर्माल्यावर प्रक्रिया करून आपल्या उद्योगाला सुरुवात केली.
यंदा महानगरपालिकेकडून गणपती विसर्जनासाठी १०५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी निर्माल्य संकलित करण्यासाठी निर्माल्य कलश देखील ठेवण्यात आले होते. तसचं नैसर्गिक तलाव, खाडी, समुद्र आदी जिथं विसर्जन होत, त्या ठिकाणी हे निर्माल्य कलश ठेवले गेले होते. या निर्माल्य कलशात निर्माल्यासह प्लास्टिकच्या, सजावटीच्या आणि इतर टाकाऊ वस्तू टाकल्या जातात. मग त्यापासून विविध वापर करण्या योग्य अशा वस्तू या बचत गटांच्या महिला तयार करत आहेत.
ख़त निर्मितीतुन उपलब्ध होत आहे राजगाराचं साधन :
बचत गटाच्या महिला परिसरात आणि घरोघरी जावून तिथून निर्माल्य संकलित करतात. त्यामुळे देव पूजेच्या कार्यात वापरल्या जाणा-या निर्माल्याची आता हेळसांड होत नाही. त्याचबरोबर टाकाऊ निर्माल्यातून खताची निर्मिती केली जात असल्यानं शहराची स्वच्छता ही आबाधित राहत असून पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. या उपक्रमातून एकिकडे कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक तलावांचं, खाड्यांचं संरक्षण केलं जात आहे तर दुसरीकडे यातूनचं इथल्या महिलांना रोजगाराचं एक साधन देखील उपलब्ध होत आहे.