पालघर : केंद्रीय संचार ब्यूरो, नाशिक, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पालघर मध्ये पोषण अभियान मल्टिमीडिया चित्र प्रदर्शनी या दोन दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनीचं उद्घाटन आज पालघरचे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रवीण भावसार, पुणे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो च्या प्रदर्शन सहाय्यक अधिकारी शिल्पा पोफाळे, नाशिक केंद्रीय संचार ब्युरो चे सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी सदाशिव मलखेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं.
पालघर तहसीलदार कार्यालयाच्या हॉल मध्ये आज आणि उद्या असे दोन दिवस पोषण अभियान मल्टिमीडिया चित्र प्रदर्शनी असणार आहे. या दोन दिवसाच्या पोषण अभियान मल्टिमीडिया चित्र प्रदर्शनी मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सकस आहार स्पर्धा, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे स्पर्धा या सारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या मध्ये पालघर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका, कार्यकर्त्या, मदतनीस यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी पाक कृती स्पर्धा आणि सकस आहार स्पर्धेत उत्कुष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं.
या कार्यक्रमा दरम्यान स्वच्छता हि सेवा आणि एक पेड मां के नाम या अभियाना अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालघरच्या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आलं. तसचं सर्वांना स्वच्छतेची शपथ हि देण्यात आली. या पोषण आहार प्रदर्शनात भरड धान्यांविषयी माहिती देणारी, कोणत्या भरड धान्यापासून कोणत्या पाक कृती तयार करता येतात, भरड धान्याचा वापर कसा करावा याविषयी माहिती देणारी फलके लावण्यात आली आहेत.