कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत २८ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या ५०७ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयाच्या शासन आदेशाची प्रत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या चौकात क्षीरसागर यांना खांद्यावर घेवून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
महापालिकेच्या ड्रेनेज, पवडी, पाणी पुरवठा, आरोग्य, विद्युत, उद्यान, कार्यशाळा विभागात ५०७ कर्मचारी २८ वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर काम करत होते. त्यांना दर महिन्याला २६ दिवस रोज ६८० रुपये वेतन मिळत होते. पण इतर कोणतेही शासकीय लाभ मिळत नव्हते. परिणामी काम जबाबदारीचे, शासनाच्या कर्मचाऱ्यां सोबतच पण पगार कमी इतर लाभ नाही, अशी त्यांची स्थिती होती. सेवेत कायम करावं यासाठी शासनाकडे दीर्घकाळ पाठपुरावा करत होते. मात्र त्यांच्या मागणीला यश येत नव्हतं. शासनानं आता सेवेत कायम केल्यानं कर्मचाऱ्यांना सरासरी दरमहा १६ ते १७ हजार रुपये पगार आणि शासनाचे इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मिळणार आहेत.
नगरविकास विभागाने सेवेत कायम करण्याचा आदेश काढताना ५०७ कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही, असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. परिणामी सेवेत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वर्षाला महापालिकेस सुमारे १० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून शुक्रवारी रात्री साडेतीन वाजता ५०७ कर्मचाऱ्यांना सेवेत करण्याच्या आदेशावर सही घेण्यात आली.