पालघर : अखेर श्रमजीवी संघटनेच्या बॅनर खाली आदिवासी बांधवांनी आपल्या निर्णायक बेमुदत आंदोलनात यश मिळवलं आहे. 5000 पेक्षा जास्त प्रलंबित वनदाव्यांचा निपटारा अवघ्या 10 दिवसांतच करण्यात त्यांनी प्रशासनाला भाग पाडलं. आदिवासी बांधवांनी तब्बल 10 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. अखेर विजयादशमीच्या दिवशी या आंदोलनाला यश आलं. याविषयी माहिती देताना श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितलं कि, लढाई लढल्या शिवाय आपले अधिकार मिळतील अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. या संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाच्या खऱ्या मालकाने लोकसेवकाना त्यांचे खरे काम करण्यास भाग पाडण्यासाठी केलेला संघर्ष महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण संघर्ष म्हणून नोंदीत राहिलं.
दहा दिवस आपल्या वन पट्ट्यांसाठी लढत असलेल्या आदिवासींना पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वन दाव्यांचं वाटप करण्यात आलं. अनुसूचित जमाती व अन्य पारंपारिक वननिवासी अधिनियम २००६ च्या कायद्यान्वये दाखल वन अधिकार दाव्यांबाबत अक्षम्य प्रलंबन हे आंदोलनाचं मुख्य कारण ठरलं होत. दहा दिवस तब्बल सात हजार आदिवासी वन हक्क दावेदार उन, पावसासाची तमा न बाळगता आपल्या अधिकारासाठी बिऱ्हाड घेऊन बसले होते. दहाव्या दिवशी तब्बल 610 वन पट्टे आणि 4146 वन दाव्यांची तपासणी पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी जिल्हा स्तरीय वन समिती कडे सादर करून आंदोलनाची सांगता झाली. या मिळालेल्या वन पट्ट्यावर वृक्षारोपण करून वन संरक्षण करण्याच्या सूचना यावेळी पंडित यांनी वन पट्टे मिळालेल्या आणि राखलेल्या आदिवासींना दिल्या.
रस्त्यावर राहणे, तिथेच जेवणे आणि उन, पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर झोपणे आदी गोष्टी या आंदोलना दरम्यान केल्या गेल्या. विवेक पंडित स्वतः या लढाईत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारात वस्ती करत असल्याचं पाहून पालघर, ठाणे जिल्ह्यातून सुद्धा हजारो तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते.
लढाई लढल्या शिवाय आपले अधिकार मिळतील अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. स्वातंत्र्य वीरांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणारे गांधीजी, भगत सिंग यांचे खरे वारसदार श्रमजीवीचे सैनिक आहेत.
विवेक पंडित – संस्थापक, श्रमजीवी संघटना
मी अनेक आंदोलनं पाहिली आहेत मात्र इतक्या शिस्तबध्द पद्धतीने कोणतेही अंहिसक प्रकार न करता सलग दहा दिवस सुरू असलेले आंदोलन मी पहिल्यांदाचं पाहिले. जनतेच्या रक्षणासाठी असलेले पोलीस म्हणून जे जे काही करता आले ते आम्ही केले.
बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर