पालघर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात महायुती एकत्र निवडणूक लढवत असून त्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांचा समावेश आहे. जागावाटपाबाबत नुकत्याच झालेल्या दीर्घ बैठकीनंतर भाजपने आज पहिली यादी जाहीर केली.
यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या १३२ – नालासोपारा विधानसभा सीट साठी भाजप ने आपल्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. नालासोपारा विधानसभा मतदार संघातून भाजप कडून राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप कडून राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला.
राजन नाईक यांच्या राजकीय कारकीर्द बद्दल सांगायचं झाल्यास जवळपास 37 वर्षांपासून ते भाजप मध्ये कार्यरत आहेत. दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यापूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजप कडून नालासोपारा विधानसभा मतदार संघात उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना केवळ 60 हजार मते मिळाली होती. ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2014 नंतर आता पुन्हा 2024 मध्ये पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या त्यांच्याकडे नालासोपारा विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
वसई आणि नालासोपारा मतदार संघ हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचे गड मानले जातात. इतर कोणताही उमेदवार त्या ठिकाणी सहजासहजी निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे. मग असं असताना भाजप सारख्या पक्षाकडून राजन नाईक यांना उमेदवारी दिली गेल्याने अनेक प्रश्न उठू लागले आहेत. याला एक राजकीय खेळी समजली जात आहे.