विरोधी पक्ष केवळ आरोप, शिव्या आणि श्राप देण्याचं काम करत आहे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
पालघर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू झाल्यानंतर केवळ पाच महिन्यात २ कोटी ३० लाख बहिणींपर्यंत सरकार पोहोचले. यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली असून या योजनेबाबत विरोधकांनी अफवांचा बाजार सुरू केला आहे. विरोधी पक्ष केवळ आरोप, शिव्या आणि श्राप देण्याचं काम करत आहे अशी सडकून टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. जनसंवाद दौऱ्यात रविवारी खासदार डॉ. शिंदे यांनी पालघर आणि बोईसर मतदार संघांचा आढावा घेतला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत २ कोटी ३० लाख बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे ७५०० रुपये जमा झाले आहेत. या योजनेमुळे बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. विरोधक मात्र ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. काही जण सरकार बदलल्यानंतर ११ दिवसांत ही योजना बंद करू असे सांगत आहेत. त्यांच्या सरकारमध्ये बहिण, भाऊ, शेतकरी कोणालाच सक्षम केलं गेलं नाही. मात्र आमच्या सरकारच्या काळात बहिणींना, भावांना सक्षम करण्याचं काम केलं गेलं. त्यांनी मागील दोन वर्ष सरकारला फक्त शिव्या श्राप देण्याचं काम केलं. याउलट राज्यातील कोट्यवधी महिलांच्या मनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. लेक लाडकी, लाडका भाऊ, शेतकरी यांच्यासाठी सरकारने योजना आणल्या.
आचार संहिता लागू झाली असली तरी थेट अनुदान देणाऱ्या योजनांवर कोणताही परिणाम होत नाही असं ही ते म्हणाले. विरोधकांच्या मनात धडकी भरल्याने योजनेबाबत अफवा पसरवण्याचं काम ते करत आहेत. आचार संहिता संपल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे दिले जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केले. मात्र हरियाणात त्यांचे मनसुभे मतदारांनी उधळून लावले. महाराष्ट्रात महायुती सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जात आहे. इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारले जात आहे. बौद्ध समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना १० लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पाच वेळा या संस्था अनुदान घेऊ शकतात. सरकार प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार आहे. त्यामुळे विरोधकांचे फेक नरेटीव्ह आता चालणार नाहीत असे खासदार डॉ.शिंदे म्हणाले.
यावेळी विरोधी पक्षावर निशाना साधताना ते म्हणले कि, महायुतीमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी कोणतीही स्पर्धा नाही. हे सरकार लोकांसाठी काम करणारे आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये रोज कोणी ना कोणी उठते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा अशी मागणी करते. यासाठी काहीजण दिल्लीत जाऊन आले.
पालघर जिल्ह्यातल्या जागा वाटपाबाबत बोलताना खासदार शिंदे म्हणाले की, महायुती सर्वच जागांवर लढेल आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष ताकदीनं प्रयत्न करतील. पालघर जिल्ह्यातील उमेदवाराबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.
जनसंवाद यात्रेच्या निमित्त पालघरच्या दौऱ्यावर आलेले खासदार शिंदे यांनी यावेळी पालघर आणि बोईसर विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यापूर्वी जनसंवाद यात्रेतून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ , मराठवाडा, कोकण आणि मुंबई मधील ५० हून अधिक विधानसभा मतदार संघाचा आढावा त्यांनी घेतला आहे. या यात्रेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील लोकांचे प्रश्न, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद ते साधत आहेत.