पालघर : पालघरमध्ये पुन्हा एकदा गडचिंचले हत्याकांडाची पुनरावृत्ती पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तलवाडा इथं संशयास्पद फिरणाऱ्या एका इसमाला गावकऱ्यांनी घेरलं होतं. ही माहिती मिळताच पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि अधिकारी ठिकाणी दाखल झाले.
त्यांनी घेराव घातलेल्या इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. तपासाअंती हा इसम मुंबईतून फरार आरोपी असल्याची माहिती समोर आली. या आरोपीनं हैदराबाद इथल्या एका सोने व्यापाराला 1 किलो बनावट सोनं देऊन 39 लाखांचा गंडा घातला होता.
मात्र अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं तो फरार होऊन विक्रमगड मधल्या जंगलाचा आश्रय घेत होता. त्याला गावकऱ्यांनी घेरल्या नंतर या ठिकाणी तातडीनं पोलीस प्रशासन दाखल झालं. त्यामुळे गडचिंचले इथं झालेल्या हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता टळली आहे.