दांडेकर महाविद्यालयात जागतिक हिंदी दिवस संपन्न
पालघर : देशामध्ये सर्व राज्ये जरी वेगवेगळया भाषेत बोलत असली तरीही या देशाला एका धाग्यात जोडण्याचे काम हिंदी भाषेने केले आहे. मानवतावादी मुल्ये जगभरामध्ये रुजवायची असतील तर जगामध्ये भारत देशाची आवश्यकता आहे आणि ही मुल्ये जगभरात पोहोचवायची असल्यास हिंदी भाषेची आवश्यकता आहे असं मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.जोगेंद्रसिंग बिसेन यांनी यांनी व्यक्त केलं. पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयात जागतिक हिंदी दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील २५० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
भाषावार प्रांतरचना झाली असली तरी सर्व देशाला जोडण्याची मुख्य जबाबदारी हिंदी भाषेने केली आहे. जागतिक स्तरावर सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाषेच्या माध्यमातून फक्त देश-प्रांत जोडले जात नाहीत तर भाषेच्या माध्यमातून संस्कृती जोपासण्याचे ही काम केले जाते. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व आले आहे. त्या माध्यमातून आपले विचार, आपली संस्कृती, आपली मुल्ये जोपासण्याचे काम होईल, असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानात दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा. महेश देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख डॉ. संगीता ठाकूर यांनी केले.
भाषा ही प्रवाही असली पाहीजे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोजगार मिळविण्यासाठी हिंदी भाषेतील विविध रोजगाराच्या संधी पाहून त्याअनुषंगाने हिंदी भाषेच्या विविध परीक्षांना सामोरे जावे.
डॉ. किरण सावे – प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय