2024 या वर्षात जिल्ह्यात 170 अपहरणाचे गुन्हे दाखल
पालघर : पालघर जिल्ह्यात एका वर्षाच्या काळात 171 बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या 77 आणि 94 विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. बलात्काराच्या एकूण 77 घटनांपैकी 67 आरोपी हे पिडीतांच्या ओळखीचे असल्याचे निष्पन्न झालं आहे. तर जिल्ह्यात झालेल्या 94 विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये 84 आरोपी हे ओळखीचे असल्याचं समोर आलं आहे.
2024 मध्ये जिल्ह्यात 170 मुला मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या होत्या. त्यात 7 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातल्या 140 मुलींचा आणि 30 मुलींचा समावेश आहे. त्यापैकी 28 मुलांना आणि 124 मुलींना परत आपल्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. हि आकडेवारी पाहता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुलींचं अपहरण झाल्याचं दिसून येत आहे.
जिल्ह्यात 2024 या वर्षात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, सोनसाखळी, वाहनासह इतर चोरी अशा 545 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दाखल गुन्ह्यांपैकी 394 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी 624 आरोपींना अटक करण्यात आली होती.
अंमली पदार्थ ताब्यात बाळगणे, विक्री व सेवन करणे, मटका, जुगार, अवैध मद्या, अवैध अग्नीशस्त्र, फसवणूक, खंडणी, मारामारी, दुखापत, अपघात, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकरणात 1643 गुन्हे दाखल करून 670 आरोपींना अटक करण्यात आली. मोटार अपघातांचे 156 गुन्हे घडले असून यामध्ये 328 जणांचा मृत्यू झाला आहे. सेशन कोर्टात 204 केसेस या सुनावणीसाठी आहेत. त्यापैकी 48 केसेस न्यायालयाने निकाली काढल्या आहेत. तिथे 10 टक्के गुन्हे साबित झाले आहेत. तर जेएमएफसी कोर्टात 614 केसेस सुनावणीसाठी असून 58 टक्के साबित झाले आहेत.
2024 मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2212 वाहनांवर कारवाई करून 11 लाख 66 हजार 450 रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यात 213 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जनसंवाद अभियान :
नागरिक आणि पोलीस यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी तसचं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालघर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियान सुरु करण्यात आलं. या माध्यमातून नशामुक्ती, बालविवाह प्रथा रोखणे, वेठबिगारी प्रथा बंद करणे, महिला समुपदेशन मेळावा, विविध स्पर्धा, विद्यार्थी समुपदेशन मेळावा, पोलीस आणि सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण, स्थानिक लोककलांना प्रोत्साहन, सायबर गुन्हे जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, रोजगार मेळावा आदींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली भीती दूर करून विश्वास निर्माण करण्याचा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वागत कक्ष, सीसीटीव्ही, भरोसा सेल, जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष, सीसीटीएनएस प्रणाली यांच्या माध्यमातून पोलीस ठाणे अधिक अद्ययावत आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर …