पालघर : जल जीवन मिशन हे एक आंदोलन असून प्रत्येक घरात पाणी पुरवण्यासाठी हे मिशन राबवून जिल्ह्यातल्या पाणीटंचाई चा प्रश्न सोडवायचा असल्यास सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
पालघर जिल्ह्याच्या दौर्या दरम्यान जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
पाणीटंचाई हा पालघर जिल्ह्यातला भीषण प्रश्न असून जिल्हाधिका-यां सोबत पूर्ण यंत्रणा या मिशन मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी तथा गटविकास अधिकारी यांना मार्गदर्शन करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यात समाविष्ट करून घेतलं पाहिजे असं मतही या वेळी त्यांनी व्यक्त केलं. तसचं पाणीपुरवठा योजनेतल्या प्रलंबित प्रश्नांचा येत्या दोन महिन्यात योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री यांनी दिले.
या बैठकी दरम्यान राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रगती पथावरील कामांचा घोषवारा, कामाची संख्या, आर्थिक दृष्ट्या पूर्ण कामे, भौतिक दृष्ट्या पूर्ण योजना, भौतिक प्रगती, कामे पूर्ण करण्याचं नियोजन तसचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधल्या प्रगती पथावरील योजनांची माहिती, जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावीत योजनांची माहिती, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा, पाणीपट्टी वसुली अहवाल आदि योजनांबद्दल विस्तृत आढावा घेण्यात आला.
या आढावा बैठकीतस खासदार राजेंद्र गावित जि. प.अध्यक्ष भारती कामडी, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, आमदार सुनील भुसारा आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आर.विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.एस के. सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, प्रकल्प अधिकारी प्रजित नायर, पाणी पुरवठा प्रधान सचिव आदि उपस्थित होते.