पालघर : शेतीला सिंचन सुविधा निर्माण होऊन शेतीत उत्पादन वाढवण जेणे करून शेतकरी आथिर्क दृष्टया सक्षम होईल या उद्देशानं शासनाच्या रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरिंची योजना कार्यान्वित करण्यात आली. 94 गाव-पाडे असणाऱ्या पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात सद्यस्थितीत रोहयो योजने अंतर्गत सिंचित विहिरीचं एक देखील काम सुरू नाहीये. गेल्या वर्षी तालुक्यातल्या विविध गावां मधल्या 30 विहिरी प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा स्तरावर पाठवण्यात आल्या होत्या. मात्र रो.ह.यो अंतर्गत सिंचित विहिरीसाठी 34 प्रकारची कागदपत्रे लागत असल्यानं गेल्या वर्षी पुन्हा हे प्रस्ताव अपूर्ण असल्याचं कारण देत पंचायत समिती कडे पाठवण्यात आले. पंचायत समितीनं या 30 प्रस्तावाची पूर्तता करून ते पुन्हा जिल्हा परीषदे कडे पाठवले.
दोन वर्षापासुन लाभार्थ्याचे पंचायत समितीत हेलपाटे :
असं असतांना या वर्षी हे प्रस्ताव तातडीनं मंजूर होतील या आशेवर शेतकरी असतांना जिल्हा परिषदे ने हेच प्रस्ताव अपूर्ण असल्याचं कारण देत पुन्हा पंचायत समिती कडे पाठवले आहेत. पंचायत समिती कडून पुन्हा या कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम सुरु असल्याचं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यां कडून सांगण्यात येत असलं तरी गेल्या दोन वर्षापासुन सिंचन विहिरीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना संताप आता अनावर झाला आहे.
रोहयो योजनेतल्या सिंचित विहिरीना जि.प. नं तातडीनं मंजुरी देण्याची मागणी :
त्यामुळे रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीची कामं सुरु करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्याकडुन केला जात आहे. लवकरात लवकर सर्व विहिरींना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कडून मंजुरी देऊन ही सिंचन विहिरींची कामं सुरु करण्याची मागणी लाभार्थ्यां कडुन केली जात आहे.
या योजनेमुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बागायती फुलु शकतात. आणि पाणी टंचाईवर देखील मोठी मात होउ शकते. मात्र या विहिरींच्या कामाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कागदपत्राच्या पूर्ततेत अडकवून दिरंगाई करत असल्याचा आरोप लाभार्थ्या कडुन केला जात आहे.
या विहीरींमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी शासनाकडून 3 लाख रुपयाचं अनुदान दिलं जात असल्यानं लाभार्थी संख्या वाढत आहे.