मुंबई : हिवाळा ऋतू सुरू झाल्यानंतर थंडीमुळे काही जणांना आरोग्याच्या छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात. या थंडीच्या काळात अनेकांच्या रोगप्रतिकारशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. या समस्या टाळण्यासाठी आरोग्याची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहेत. हिवाळा हा ऋतू अतिशय आनंददायक आणि रोमांचक असतो. खरं सांगायचं तर हा थंडीचा कालावधी आरोग्याच्या दृष्टीने सर्वात्तम मानला होता. कारण थंडीत प्रचंड भूक लागते, त्यामुळे आहारही चांगला राहतो. परंतु, हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतात. यामुळे बऱ्याचदा लोकांना सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. थंडीच्या मौसमात दम्याच्या रूग्णांमध्येही वाढ होते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे.
अशी काळजी घ्यावी :
१) शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी द्या : शरीरासाठी व्हिटॅमिन डी अतिशय फायदेशीर आहे. अन्नपदार्थांसोबतच सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळत असते. त्यामुळेच त्याला सनशाईन असे म्हटले जाते. पहाटेच्या वेळी किमान २० मिनिटे कोवळ्या उन्हात उभे राहण्याचा प्रयत्न करा. व्हिटॅमिन डीमुळे शरीरातील हाडे आणि स्नायू बळकट करण्यास मदत होते.
२) योग्य कपडे परिधान करा : थंडीत कुठेही घराबाहेर पडताना लोकरीचे कपडे घालायला विसरू नका. याशिवाय संपूर्ण हात झाकले जातील, असेहीच कपडे परिधान करा.
३) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा : शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दर आठवड्याला तुम्हाला किमान १५० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. य़ोगा किंवा एरोबिक्स अशाप्रकारे व्यायाम करणं अधिक फायदेशीर ठरू शकते. घरच्या घरी गाणी लावून त्यावर नृत्यू करणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
४) त्वचेची निगा राखा : हिवाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या दिसून येतात. यात त्वचा कोरडी पडणे आणि खाज सुटू शकते. याशिवाय ओठंही कोरडे पडतात. अशावेळी भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय त्वचेला कुठलाही संसर्ग होऊ नये, यासाठी त्वचेची स्वच्छता राखा आणि नियमितपणे आपले हात धुवा.
५) संतुलित आहाराचे सेवन करा : हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. संसर्गजन्य आजारांची लागण होण्यापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. यासाठी व्हिटँमिन डी असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. हिवाळ्यत अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचे सेवन करावे. फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. थंडीत शक्यतो तेलकट-तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावेत.
६) पुरेशी झोप घ्या : रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. झोपेमुळे ताणतणाव कमी होतो. याशिवाय शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत होते.
७) आजारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या : हिवाळ्यात दमा, सर्दी, फ्लू, सांधेदुखी, खोकला आणि घशा खवखवणं यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. अशा समस्या जाणवत असल्यास दुखणं अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.