मुंबई : वाढवण बंदर विरोधी संघर्षात राज्य सरकार स्थानिकांसोबत असून जनतेच्या विरोधाला डावलून हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आता बंदर विभागाचे मंत्री अस्लम शेख यांनी घेतली आहे.
पालघर जिल्ह्यातल्या वाढवण गावात होणार असणा-या प्रस्तावित वाढवण बंदराला इथल्या स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढवण बंदर विरोध संघर्ष समितीनं आक्रमक भूमिका घेतली असून बंदराच्या विरोधात नुकतीच म्हणजे १५ डिसेंबरला मुंबईच्या कफ परेड पासून डहाणूच्या झाई पर्यंतच्या कोळीवाड्यांनी बंदची हाक दिली होती. आणि या दिवशी किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
अस्लम शेख यांनी सोमवारी एक ध्वनीचित्रफित प्रसारित करुन त्यात आपली वाढवण बंदरा संदर्भातली भूमिका मांडली. ते म्हणाले की, १९८६ च्या पर्यावरणीय संरक्षण कायद्यानुसार १९९६ साली डहाणू तालुका पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जर इथल्या जैवविविधतेला धोका पोहोचणार असेल आणि पारंपारिक मच्छिमारांचा रोजगार हिरावला जाणार असेल तर ह्या प्रकल्पा विरोधातल्या संघर्षात आम्ही स्थानिक भूमिपूत्रांसोबत आहोत.
अत्यंत दुर्मिळ जीवंत शंखासाठी वाढवण प्रसिद्ध आहे. समुद्री प्रवाळ, शेवाळ आणि इतर जैवविविधता या प्रकल्पामुळे नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी कोणताही सर्व्हे आम्ही होऊ देणार नाही. तसचं मच्छीमारांच्या पाठिशी ठामपणे उभं राहणार असल्याची भूमिका अस्लम शेख यांनी मांडली.