धुळे / नितीन जाधव : पंजाब येथून देशी बनावटीच्या पिस्तुलांची खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र – मध्यप्रेदशच्या सीमावर्ती भाग असलेल्या शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात आलेल्या तिघांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून ८ देशी बनावटीची पिस्तुले आणि काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. मध्यरात्री उशिरा शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कारसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पंजाब राज्यातील काही लोकं हे बेकायदेशीरपणे अग्नीशस्त्र अर्थात पिस्तुले खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात आलेले आहेत अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना सुत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार, सपोनि अभिषेक पाटील यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, हे.कॉ. राजू सोनवणे, संभाजी वळयी, पो.ना, चत्तरसिंग वसावद, संजीव जाधव, पवन गवळी, पो कॉ इसरार फारुकी यांचे एक पथक तयार करुन मिळालेल्या महितीनुसार महाराष्ट्र- मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत वरला परिसरात शोध मोहीम करण्यासाठी रवाना करण्यात आलं.
या पोलीस पथकाला मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सांगवी ते वरला रोडवर जोयदा गावाजवळ पंजाब पासिंग असलेली एक संशयीत कार वरला गावाकडुन जोयदा गावाच्या दिशेने येत असल्याचं दिसून आलं. पोलिस पथकाने प्रसंगावधान राखत पोलीस वाहन रस्त्यात आडवे लावून संशयीत कार अडवली. त्या कारमध्ये ३ जण होते. या तिन्ही जणांना तात्काळ पथकाने वाहना बाहेर काढून त्यांची अंग़ झडती घेतली असता त्यांच्या कमरेला प्रत्येकी एक अशा ३ देशी बनावटीच्या पिस्तुल आणि प्रत्येक पिस्तुलच्या मेगजीनमध्ये २ जीवंत काडतुसे अशी ६ काडतुसे मिळून आली. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी एक मोबाईल फोन आणि १५ हजार रुपये रोख रक्कम मिळून आली.
हे तिन्ही जण पंजाब राज्यातले असून सुखविंदर सिंह प्रकाश सिंह शिख (वय २१), लवदीपसिंह दलजीतसिंह जाट (वय २३), दरजनसिंह बलविंदसिंह जाट (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचं समोर आलं. त्यानंतर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये एक काळया रंगाच्या कॉलेज बँग मध्ये अजुन ५ देशी बनावटीचे पिस्तुले मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी २ लाख रुपये किंमतीच्या एकूण ८ देशी बनावटीच्या पिस्टल मैगजीनसह, १२०० रुपये किंमतीचे ६ जिवंत काडतुसे, १५ हजाराची रोख रक्कम, १६ हजार किंमतीचे ३ टचस्क्रिन मोबाईल फोन आणि ३ लाख रुपये किंमतीची स्विष्ट कार असा एकूण ५ लाख ३२ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चौकशीत त्यांनी मध्यप्रदेश येथुन स्वतःसह मित्रांकसाठी स्वरक्षणार्थ ही देशी पिस्तुले आणि काडतुसे खरेदी केले असल्याचे सांगितले. याप्रकरणी हे.कॉ. संभाजी वळवी यांचे तक्रारी वरुन शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका (सांगवी) पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.