धुळे / नितीन जाधव : धुळे जिल्ह्यासह नाशिक परिक्षेत्रात सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्याच्या कालावधीत शेतीमाल खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत सहा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले आहेत. तसेच नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लुटणाऱ्या टोळ्या, अमली पदार्थ, अवैध शस्त्र विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी काम केलं असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी बुधवारी धुळ्यात आयोजित वार्ताहर परिषदेत दिली.
धुळे जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक आढावा दौऱ्यावर महानिरीक्षक प्रतापराव देगावकर हे गेल्या दोन दिवसांपासून आलेले आहेत. त्यांनी धुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये पाहणी केल्यानंतर बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव हे उपस्थित होते.
यावेळी महानिरीक्षक दिघावकर यांनी माहिती देताना सांगितले की, धुळे, अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामीण आणि नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी फसवणूकी बाबत 191 गुन्हे दाखल असून शेतकऱ्यांना सहा कोटी 75 लाख 88 हजार रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी 30 गुन्हे दाखल झाले असून त्यात 37 लाख 38 हजार रुपये आतापर्यंत तरुणांना परत मिळवून देण्यात आलेत. तर अमली पदार्थ विरुद्धच्या विशेष मोहिमेत 520 किलो गांजा आतापर्यंत जप्त करण्यात आला आहे. तसचं चार कोटी रुपयांचा गुटखा देखील पकडण्यात आला. बनावट दारू बनवणारे चार कारखाने उधवस्त केले गेले. अवैध शस्त्र बाळगणा-या आणि विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात आत्तापर्यंत 59 गावठी पिस्तुले, 80 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर 121 तलवारी आणि चाकू कोयते अशी घातक शस्त्रे सुद्धा पकडली आहेत.
येत्या काळात आणखीन प्रभावीपणे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना केली जाणार आहे. गुन्हेगार दत्तक योजना राबवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला जाईल असं ही महानिरिक्षक प्रतापराव देगावकर यांनी सांगितलं.