पालघर : पालघर जिल्ह्यात अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष पंधरवडयाचं आयोजन 14 ते 30 नोव्हेबर दरम्यान करण्यात आलं होतं. यात पालघर जिल्ह्यातल्या 16 अनाथ बालकांना पालघरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय / स्वंयसेवी बालगृहात दाखल होणा-या अनाथ मुलांना संस्थेतुन बाहेर पडतांना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्या कारणानं त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान आणि विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे महिला व बाल विकास विभाग निर्णय 06 जुन 2016 अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमा अंतर्गत मान्यता प्राप्त संस्थामध्ये दाखल असलेल्या बालकांना आणि समाजातल्या अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातल्या पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्हा स्तरावर 14 ते 30 नोव्हेबर या कालावधीत पंधरवडा राबविण्यात आला होता. या पंधरवडया दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा मधल्या नारायण चंद्र ट्रस्ट इथल्या बालगृहातल्या एकुण 16 अनाथ बालकांना पालघरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं असल्याची माहिती पालघर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.