नीता चौरे / पालघर : दमण (गुजरात) समारीन 85 सागरी मैल अंतरावर वसई इथल्या ‘विश्वराजा’ क्र.IND-MH-6-MM-168 या नौकेच्या खलाशावर सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
25 डिसेंबरला वसई इथली विश्वराजा हि नौका मासेमारीसाठी गेली होती. ही नौका वसई पासून 85 सागरी मैल अंतरावर आपली मासेमारीची जाळी पाण्यात सोडत असताना दमण मधल्या DD/०3/MM/०338 या पर्ससीन मासेमारी नौकेवरील खलाश्याशी मासेमारीच्या जागेबाबत मज्जाव केल्यानं इतर 7 ते 8 दमण इथल्या पर्ससीन नौकाधारकां सोबत भांडण झालं. आणि दमण मधल्या या मासेमारी नौकेवरील खलाशांनी वसईच्या विश्वराजा या बोटीला चारी बाजूनं घेरुन बोटीला ठोकर मारुन बुडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना जिवे मारण्याचा हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रकारामुळे नौकेचे 4 ते 5 लाखांचं नुकसान झालं असुन या बोटीवरील खलाशी मोजेस संज्याव ( वय- 49 वर्ष ) हे जखमी झाल्याची माहिती वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाला दिली.
मत्स्यव्यवसाय विभागाकडून या बोटीची पहाणी करण्यात आली असून यात बोटीच्या नालेचा आणि गनवेलच्या भागाचे धडक बसल्याने नुकसान झाल्याचं दिसून आलं. झालेल्या प्रकाराबाबत बोटीचे मालक नितिन नाझरेथ बुदुल यांनी वसई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. पुढील तपास एलोगेट पोलिस ठाणे, मुंबई इथं वर्ग करण्यात आला आहे.
समुद्रात घडलेल्या या प्रकाराची दखल पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी घेतली असून मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावं. आणि आपापसात तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास सागरी कार्यद्यांतर्गत तसेच फौजदारी कायद्यान्वये संबंधीतावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या आहेत.
याबाबत मत्स्यव्यवसाय ठाणे (पालघर) चे सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी घडलेल्या प्रकाराबाबत वरीष्ठ कार्यालयास योग्य ती माहीती अवगत करुन दिली असून पालघर चे जिल्हाधिकारी यांच्या सूचने प्रमाणे जिल्हयातल्या सर्व सागरी मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करताना कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि आपापसात सलोख्यानं मासेमारी व्यवसाय करावा असं आवाहन केलं आहे.