नीता चौरे / पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या चित्रालय भागात असलेल्या श्रीरंग पाटील यांच्या मालकीच्या मंगलम ज्वेलर्स च्या दुकानात रात्री 3 वाजताच्या सुमारास मोठा दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास चित्रालय मधल्या श्रीरंग पाटील यांच्या मंगलम ज्वेलर्स च्या दुकानात अज्ञात दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानाच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या बाजूच्या गाळ्यातून गॅस कटरच्या साहाय्यानं भिंत तोडून ज्वेलर्स दुकाना मधले सेफ कापून त्यातून अंदाजे जवळपास 60 लाखांची रोख रक्कम आणि 14 किलो सोनं चोरून दरोडेखोर पसार झाले आहेत.
पाटील हे खुप जुने व्यवसायिक असून त्यांच्या गेल्या दोन पिढ्यापासून हा सराफी व्यवसाय सुरू आहे. नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी दुकान बंद केलं. बुधवारी सकाळी त्यांचं हे सोन्याचांदीचं दुकान फोडल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी बोईसर पोलिसांना दिली.
या दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, लोकल क्राईम ब्रांचची टीम आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.
एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्यानं पाटील कुटुंब पुरते हादरून गेलं आहे. या दरोड्यामुळे आजूबाजूच्या ज्वेलर्स मालकांमध्ये आणि इतर दुकान व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पोलिसांच्या दरोड्यानंतर ज्वेलर्स दुकानाच्या बिल्डिंगचा वॉचमन फरार असून त्याचा या दरोड्यात सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सहा ते सात चोरट्यांचा समावेश असल्याचं दिसून येत असल्यानं पोलीसांनी आता या दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.