पालघर / नीता चौरे : जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जसं मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तसचं महामार्गा लगतच्या ठिकाणी आणि इतरत्र देखील दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशा रस्ते अपघातांना कुठे तरी आळा बसावा म्हणून पालघर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय यंत्रणेतल्या अधिका-यांना आणि कर्मच्या-यांना नववर्षात दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणं सक्तीचं करण्याबाबतचा आदेश पालघर चे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिला आहे.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहा सोबत राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येतो. रस्ता सुरक्षा पंधरवडानिमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली होती. सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हेल्मेट सक्ती निर्णयाची अंमलबजावणी शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत सुरू करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी योजलं आहे.
मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम 129 मध्ये नमूद असलेल्या कोणत्याही दुचाकी वाहन चालकानं रस्त्यावर वाहन चालवताना हेल्मेट घालणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तसचं वेळोवेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट सक्ती करण्याबाबत सूचित केलं आहे.
या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणा-या अधिका-यांना आणि कर्मचाऱ्यांना दुचाकीचा वापर करताना हेल्मेट घालणं सक्तीचं केलं आहे. या संदर्भातला आदेश 19 डिसेंबर ला जारी करण्यात आला असून नववर्षांत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जे अधिकारी – कर्मचारी या नियमांचं पालन करणार नाहित ते मोटार वाहन अधिनियम १९८८ मधल्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. आणि यापुढे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम 129 चे उल्लंघन केल्यास त्यांची गंभीर नोंद घेण्यात येइल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.