रत्नागिरी / प्रमोद कोनकर : यंदा झालेले निसर्ग वादळ आणि सलग दोन वेळा अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे यंदा कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. तो जानेवारी महिन्यात सुरू होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ऑलिव्ह रिडले ही सागरी कासवे कोकणातील विविध किनाऱ्यांवर दरवर्षी अंडी घालण्यासाठी येतात. कोकणातील विशिष्ट हवामान त्यांच्यासाठी पोषक असते. समुद्रातून येऊन ही कासवे किनाऱ्यावरील वाळूत खोलवर घरटी तयार करून अंडी घालतात आणि समुद्रात निघून जातात. ती पुन्हा येत नाहीत. सुमारे दोन महिन्यांनंतर घरट्यांमधील अंडी पूर्ण तयार होऊ त्यातून पिल्ले बाहेर येतात. आणि समुद्रात निघून जातात.
चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने सुमारे १५ वर्षांपूर्वी कासवांच्या या जीवनक्रमाचा अभ्यास केला. आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. ही अंडी फोडून खाणाऱ्या किनारपट्टीवरच्या लोकांचे प्रबोधन करून त्यांना कासवांचे जतन करण्यासाठी प्रवृत्त केले. कासवांच्या विशिष्ट जीवनक्रमाचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांना निमंत्रित करण्यात आले. त्यानिमित्ताने कासव महोत्सव भरविण्यात आले. कालांतराने वन विभागाने त्यात पुढाकार घेतला आणि कासवांच्या संरक्षणाचा कार्यक्रम आखला.
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील वेळास, दापोली तालुक्यातील आंजर्ले, कोळथरे, केळशी, कर्दे, लाडघर, पाडले, मुरूड, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर आणि तवसाळ, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, राजापूर तालुक्यातील माडबन, वाडावेत्ये या चौदा गावांमधील समुद्रकिनाऱ्यावर वन विभागामार्फत ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची मोहीम राबविली जाते.
गेल्या वर्षी जिल्ह्यातील या किनाऱ्यांवर ६५२ घरट्यांमध्ये ६५ हजार ८५३ अंड्यांचे संरक्षण करण्यात आले. त्यापैकी ३२ हजार ४३३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या कासवांना सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्यात वन विभागाला यश आले. दरवर्षी नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये अंडी घालण्यासाठी येणारी कासवे यावर्षी मात्र अजून आलेली नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत अंडी देण्याचा कालावधी पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याचे कारण असू शकते. शिवाय यावर्षी कोकण किनारपट्टीला निसर्ग वादळाचा फटका बसला. दोन वेळा समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. त्यामुळे थंडी लांबली. डिसेंबर महिन्यात पाऊस पडला. या साऱ्यांचा परिणाम कासवांच्या जीवनचक्रावर झाला आहे. ती इतरत्र विखुरलेली गेल्याने त्यांच्या मिलनाचा काळ लांबला असून ती अंडी घालण्यासाठी जानेवारीपासून येऊ लागतील असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.