जळगाव / राजेश यावलकर : केळीचे फुल आरोग्यासाठी गुणकारी असून यापासून जळगाव शहरातील डॉ.तेजोमयी भालेराव यांनी इन्स्टंट सूप तयार केले आहे. भारतीय पेटंट संस्थेने या संशोधनाला पेटंट जाहीर केले आहे. केळीचे सूप हे मधुमेहावर अत्यंत गुणकारी असून यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढीस मदत होवू शकते. केळीचे घड विकसीत होत असताना केळफुल हे गळून पडते. आणि ते वाया जाते. यामुळे त्या फुलातील अनेक पोषक आणि औषध मुल्य वाया जात असतात.
मात्र यातील औषधी गुणधर्म ओळखून डॉ. तेजोमयी भालेराव यांनी अभ्यास केला. त्यानी केळीच्या फुलापासून सुप तयार केले. या सुप मधील विविध घटकांमुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे सुप अत्यंत आरोग्यवर्धक ठरणार असल्याच डॉ.तेजोमयी भालेराव यांनी सांगितले. या सुपमुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होणार आहे. कुपोषणाचा वाढलेला टक्का, स्त्रीयांमधील मधुमेहाचे प्रमाण यावर हे सुप गुणकारी ठरणार आहे.
जगभरात अन्नधान्यावरील संशोधनात अन्न आणि औषध यांचा एकत्रित वापर यावर भर दिला आहे. त्यानुसारच हे सुप तयार करण्यात येते. केळीच्या फुलाची पावडर तयार करून पौष्टीक आणि औषधी गुणधर्म वाढतील असे घटक वापरून पाण्यात ही पावडर टाकून २ ते ३ मिनीटे उकळून लगेच हे पोषक सुप तयार होते. जळगाव जिल्ह्यात केळीतील ‘जी ९’ या टीश्यूकल्चरच्या रोपाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. डॉ.भालेराव यांनी या रोपामधील पोषक तत्वांचा अभ्यास केला. त्यामध्ये त्याना फॉस्फरस, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न आणि फायबर हे घटक आढलुन आले. या सर्व घटकांचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना ही इंन्स्टंट सुपची संकल्पना सुचली असल्याची माहिती डॉ. तेजोमयी भालेराव यांनी दिली आहे.