पालघर : आज पालघर जिल्ह्यात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालय डहाणू, उपजिल्हा रुग्णालय जव्हार, ग्रामीण रुग्णालय पालघर आणि वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात वरूण इंडस्ट्रीस या चार केंद्रांवर 400 आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे.
पालघर ग्रामीण रुग्णालयात आज जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील यांना पहिली लस टोचून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी तसेच इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात 17 हजार 411 लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यासाठी 19 हजार 500 डोसेस जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत.