पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मनोर ग्रामीण रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी स्वप्निल नारायणराव बोदमवाढ (वय-31वर्षे) आणि परिविक्षाधिन वैद्यकिय अधिकारी मितेश सुरेश पांडे (वय-26वर्ष) या दोघांना चार हजारांची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांचं एका अपघातात निधन झालं होतं. आणि त्यांचा पीएम रिपोर्ट देण्यासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी स्वप्निल नारायणराव बोदमवाढ यांनी 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी नंतर ते 5 हजारा ऐवजी 4 हजारांवर पीएम रिपोर्ट देण्यास तयार झाले. डॉ. स्वप्निल यांनी ही रक्कम परिविक्षाधिन वैद्यकिय अधिकारी मितेश पांडे यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यांनतर याबाबतची तक्रार तक्रारदाराने पालघर अँटी करप्शन ब्युरो कडे केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना 4 हजारांची लाच घेताना सोमवारी अटक केली आहे.