पालघर : वीजचोरीच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या एका कारखाना मालकाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. प्रधान यांनी दोन वर्षे कठोर कारावास आणि ३१ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. एप्रिल २०१२ मध्ये पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या वडवली इथल्या दर्पण अलाईड कंपनीत ही वीजचोरी उघडकीस आली होती.
प्रवीण सुरेशचंद जैन ( ३८ वर्षे ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीनं त्याच्या दर्पण अलाईड कंपनीत १००.५ अश्वशक्ती भाराच्या वीज वापरासाठी मीटर बायपास करून थेट वीजचोरी केल्याचं आढळून आलं होत. यात आरोपीकडून सहा महिन्यात १० लाख ३१ हजार रुपयांची सुमारे 1 लाख 25 हजार युनिटची वीजचोरी झाल्याचं निष्पन्न झालं. कल्याण मधल्या महावितरणच्या तत्कालीन विशेष पोलीस ठाण्यानं वीज कायदा- २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून आणि तपास करून आरोपीविरुद्ध ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं.
न्यायाधीश पी. पी. प्रधान यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर नायालयानं सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला २० जानेवारी २०२१ ला दोन वर्षे कठोर कारावास, ३१ लाख रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. तर दंडाच्या रकमेतील १५ लाख रुपये महावितरणकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत. यावेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील व्ही. जी. कडू यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.