पालघर जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सन उत्साहात साजरा
पालघर : पालघर जिल्ह्याला समुद्र किनाऱ्यांचं वैभव लाभलं असून जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागांत मच्छीमार बांधव मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नारळी पोर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. आज नारळी पौर्णिमेनिमित्त पालघर जिल्ह्यातल्या केळवे समुद्र किनारी केळवे गावच्या कोळी बांधवांकडून भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
पावसाळ्याच्या दिवसात समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असतो. त्यामुळे या काळात बोटी बंद असतात. या खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि आपल्या बोटी समुद्रात सुरक्षित राहाव्यात यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव मोठ्या भक्तीभावाने समुद्राची देवता वरुण देवाची पूजा अर्चना करून त्याला नारळ अर्पण करतात.
या नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केळव्याच्या कोळी बांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत केळवे मच्छीमार सोसायटीकडून – शिवाजी चौक ते कस्टम आणि जेटी वरून केळव्याच्या पाणकोट किल्ल्यापर्यंत भव्य मिरवणूक काढली होती. तसचं यावेळी कोळी बांधवांनी केळवे समुद्र किनारी आपल्या पारंपरिक वेशभूषेत अनेक कोळी नृत्य सादर केली. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी समुद्र दैवताची मनोभावे पुजा,आरती करून समुद्राला भव्य प्रतीकात्मक नारळ आणि नैवैद्य अर्पण करण्यात आलं. या सोबतच सर्व गावकर-यांनी देखील सागराला नारळ आणि नैवैद्य अर्पण करून सागर दैवताची पूजा करत मासेमारी व्यवसायात भरभराटी द्यावी अशी प्रार्थना केली.