पालघर : पालघर ( Palghar ) हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर ओळखला जातो. जो सागरी, नागरी आणि डोंगरी या तीन विभागात मोडतो. याच पालघर जिल्ह्यातला डहाणू हा भाग जिथे आदिवासी लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. व्यसन, बेरोजगारी, निरक्षरता, या सारख्या असंख्य समस्यांनी ग्रासलेला डहाणू तालुक्यातील कोसबाड हा भाग. पारंपरिक भात शेती नंतर मोलमजुरी साठी गावातले असंख्य लोक कुटुंबासोबत वीटभट्टी वर आणि इतर रोजंदारीवर कामासाठी गाव सोडून निघून जात.
पहा व्हिडीओ ….
अशातच याच गावातल्या महिलांना केंद्रशासनाच्या महाराष्ट्र राज्यं ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ( Maharashtra State Rural Livelihood Mission ) म्हणजेच उमेद ( UMED ) या महत्वकांक्षी योजनेची साथ मिळाली. गावातील १० महिलांनी एकत्र येवून साई समर्थ स्वयं सहाय्यता नावाचा एक बचत गट स्थापन केला. या गटातील सर्व सभासद महिला अत्यंत गरीब होत्या. दोन दिवस मजुरी मिळाली नाही तर कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येत असे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना इतरत्र कामाचा पर्याय शोधावा लागत असे. अशा परिस्थितीत सुद्धा या बचत गटातील महिला दर महा 100 रुपये याप्रमाणे वर्गणी गोळा करुन सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया च्या कोसबाड हिल या शाखेतील आपल्या बचत खात्यात बचत रक्कम जमा करू लागल्या. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना साथ मिळाली ती कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रातल्या शास्त्रज्ञांची. कृषी विज्ञान केंद्राने या महिलांना डहाणू आणि घोलवड भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रसिद्ध चिकू ( Chikoo ) या फळापासून विविध पदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं.

त्यानंतर या महिला चिकू या फळापासून चिकू चिप्स, चिकूचे लोणचे, चिकू पावडर या सारखे वर्षभर चालणारे विविध पदार्थ तयार करू लागल्या. हळूहळू त्यांनी तयार केलेल्या या पदार्थांची विक्री गाव आणि तालुका पातळीवर होवू लागली. सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्यं ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत त्यांनी “महालक्ष्मी सरस” या विक्री प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. आणि या प्रदर्शनामध्ये त्याच्या उत्पादनाला उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्या जिल्हा स्तरीय सरस मध्ये सुद्धा स्टॉल लावून आपल्या उत्पादनाची विक्री करू लागल्या. दरम्यान त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनापासून त्यांना वर्षाकाठी 3 लाख पेक्षा ही जास्त नफा मिळू लागला. ज्यामुळे त्यांचा या उद्योगातला आत्मविश्वास अधिकच वाढला.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत या ग्रामीण भागातल्या आदिवासी महिलांनी सुरू केलेल्या उद्योगाने आता मोठं स्वरूप धारण केलं आहे. अशात त्यांना शासनाच्या विविध योजनांचा हातभार त्यांना स्वतः चा उद्योग मोठा करण्यासाठी लाभत आहेत. चिकू पासून तयार केलेल्या या आपल्या उत्पादनाची विक्री त्या आता ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर घेऊन देखील करू लागल्या आहेत. या उद्योगातून मिळत असलेल्या आर्थिक लाभामुळे या महिला आता आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ लागल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्या आपल्या गावातल्या महिलांना देखील या माध्यमातून रोजगार देऊ लागल्या आहेत. ज्यामुळे या आणि गावातल्या इतर महिलांचं जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. आणि महिलांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
















