पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मध्ये ३९५२ चौरस मीटर क्षेत्रात नवीन जीएसटी भवन उभारण्यात येणार आहे. पालघर आयुक्तालयाच्या केंद्रीय वस्तु आणि सेवा कर भवनाचा भूमिपूजन सोहळा मुंबईच्या केंद्रीय वस्तु आणि सेवा कर आणि केंद्रीय उत्पाद शुल्क कार्यालयाचे प्रधान मुख्य आयुक्त राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते २७ फेब्रुवारीला नुकताच पार पडला. यावेळी प्रधान मुख्य आयुक्तांच्या हस्ते केंद्रीय वस्तु आणि सेवा कर भवनाचा शिलान्यास आणि वृक्षारोपण करण्यात आलं. या नव्या जीएसटी भवनाच्या भूमिपूजन सोहळयाला मुंबई सीपीडब्ल्यूडी चे मुख्य अभियंता लोरेनगोब डंग, टी.आय.एम.ए चे अधिकारी, तारापुर एम.आय.डी.सी चे अधिकारी आदी उपस्थित होते.
सीपीडब्ल्यूडी विभागाकडून या प्रकल्प बांधकामासाठी आवश्यक मंजूरी मिळाली असल्याची माहिती यावेळी प्रधान मुख्य आयुक्तांनी दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की, तारापुर एम.आय.डी.सी मध्ये या प्रकल्पाचं स्थान करदात्यांना त्यांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी सहजपणे कार्यालयात जाण्याची परवानगी देते. ज्यामुळे व्यवसाय करणं सुलभतेच्या संकल्पनेत आणखी भर पडेल.
कसं असेल हे जीएसटी भवन :
बोईसर मध्ये या जीएसटी भवन प्रकल्पाचं बांधकाम सुरू झाल्यास मुंबई विभागातल्या सीजीएसटी आणि सेंट्रल अबकारी मालकीच्या अफाट पायाभूत सुविधांमध्ये भर पडेल. हे नवीन जीएसटी भवन (Central Goods and Services Tax Building ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापुर ( तारापुर एम.आय.डी.सी ) ऑफिस च्या बाजुला असलेल्या ३९५२ चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात येणार असून यात तळघर आणि ६ मजले बांधण्याचा प्रस्ताव आहे. या इमारतीत ३ विभाग कार्यालये आणि पालघर केंद्रीय वस्तु आणि सेवा कर आयुक्तालयातले १४ रेंज कार्यालये असतील. जवळपास ३३ कोटींच्या बजट मध्ये हा प्रकल्प उभारला जाईल.
या जीएसटी भवनाच्या इमारतीची रचना जितेंद्र.के.आर यांनी केली आहे. ही इमारत पाण्याची साठवण करण्याची सुविधा आणि वीज निर्मितीसाठी फोटो व्होल्टाइक सेलसह सुसज्ज असेल. हे नवं जीएसटी भवन हिरव्यागार आणि सुरक्षित वैशिष्ट्यांमुळे अधिकारी आणि करदात्यांसाठी सोयीस्कर असेल. या इमारतीच्या बांधकामाचा ठेका हिल टॉप रेफ्रिजरेशन एजन्सीला देण्यात आला आहे.
जुलै २०२२ पर्यंत पूर्ण होईल जीएसटी भवनाचं काम :
बोईसर मध्ये नव्यानं उभारण्यात येणा-या केंद्रीय वस्तु आणि सेवा कर भवनाचं काम जुलै २०२२ पर्यंत पूर्ण होऊ शकेल अशी माहिती टी.आय.एम.ए चे अध्यक्ष डी.के.राऊत यांनी दिली आहे.