पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईचे राहणारे रिक्षा चालक पुंडलिक आनंदा पाटील हत्याकांड प्रकरणात पालघर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. त्यात दोन पोलीस कर्मच्या-यांचा समावेश आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक दतात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला रात्री मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळे गावाच्या हद्दीत गुजरात वाहिनीजवळ एका रिक्षासह एक मृतदेह रोडच्या बाजुला असलेल्या नाल्यात कलंडवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
प्राथमिक तपासात हे प्रकरण खुनाच्या गुन्ह्याचं असल्याचं आढळून आल्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत पालघर चे पोलीस अधीक्षक दतात्रेय शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्याकडे सुपुर्द केला. पालघर चे पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसचं स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथकं विरार, वसई, कल्याण, पालघर अशा वेगवेगळ्या भागांत तपासासाठी रवाना करण्यात आली.
या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता मयत रिक्षा चालक पुंडलिक आनंदा पाटील ( वय – 30 वर्षे ) हे वसई राहणारे असून ते वसई भागात रिक्षा चालवण्याचं काम करत होते. आणि वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एक महिला पोलीस कर्मचारीचे ते पती आहेत. अशी माहिती समोर आली. या महिला पोलीस कर्मचारीचे वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मच्या-या सोबत अनैतिक प्रेम संबंध होते. याबाबत जेव्हा महिला पोलीस कर्मचारीचे पती रिक्षाचालक पुंडलिक पाटिल यांना कळलं. तर ते पत्नीला तिच्या अनैतिक प्रेम संबंधाबाबत वारंवार विचारणा करत होते. याचा राग मनात धरून पोलीस पत्नीने आपल्या पोलीस प्रियकरासोबत मिळून पतीला मारण्याचा कट रचला. आणि 3 जणांना पती रिक्षाचालक पुंडलिक यांना मारण्याची सुपारी दिली.
त्यानंतर या 3 आरोपींनी महिला पोलीस कर्मचारीच्या पतीची रिक्षा वसई ते मनोरसाठी भाड्याने घेतली. आणि जसे हे लोकं मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळे गावाच्या हद्दीत आल्यावर लघवीला जाण्याच्या बहाण्यानं रिक्षातून बाहेर उतरले. तसेच हे रिक्षाचालक पती पुंडलिक सुद्धा लघवीसाठी खाली उतरले. त्याचवेळी या तिन्ही आरोपींनी त्यांच्या डोक्यावर मागुन लोखंडी रॉडनं चार-पाचं वार केले. आणि त्यांच्या मृतदेह रिक्षाच्या मागच्या सीटवर ठेवून ती रिक्षा रस्त्यालगत असलेल्या नाल्यात पलटी करून हे आरोपी तिथून फरार झाले होते.
आता पोलिसांनी आपल्या दोन पोलीस कर्मच्या-यांसह एकुण 5 जणांना या हत्याकांड प्रकरणात अटक केली आहे.