पालघर / नीता चौरे : कमी खर्चात संपूर्ण गावाला समान दाबाने पाणीपुरवठा करण्याचं तंत्र मुंबई आयआयटी ( IIT MUMBAI ) च्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रोफेसर प्रदीप काळबर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आयआयटीच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यानी विकसित केलं आहे. प्रोफेसर प्रदीप काळबर यांचं पाणी पुरवठा याविषयावर संशोधन सुरु असून त्या संशोधना अंतर्गत हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातल्या सफाळे मधल्या नंदाडे आणि चाफानगर या दोन पाड्यात प्रायोगिक तत्त्वावर नुकताच सुरु करण्यात आला आहे. हा देशातला पहिला प्रकल्प आहे.
भारतात आणि महारष्ट्र राज्यातल्या अनेक भागात पाणी पुरवठा ही खुप मोठी समस्या झाली आहे. योग्य पद्धतीने, समान दाबाने सर्वाना पाणी पुरवठा होत नाहीये. त्यामुळे पाणी पुरवठयासाठी वापरण्यात येणार्या पद्धतीनं मध्ये काय बदल केले पाहिजेत यावर गेल्या 3 वर्षांपासून मुंबई आयआयटी संशोधन करत आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जुन्या पद्धतीमध्ये त्यांनी काही बदल केले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या सफाळे मधल्या उंबरपाडा गावात २०१८ पासून मुंबई आयआयटी ( IIT MUMBAI ) च्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रोफेसर प्रदीप काळबर आणि त्यांच्या टीमनं पाणी पुरवठयाच्या समस्येचं सर्वेक्षण केलं. त्यावेळेस त्यांना आढळून आलं की, पाणी पुरवठयाच्या स्कीम मधले महत्वाचे प्रॉब्लम हे पाणी टाक्यांमध्ये प्रेशरनं न पोहचनं, पाणी पुरवठा करण्यात येणा-या टाक्यांमध्ये लिकेजेस असणं यासारखे आहेत.
करवाळे धरणातुन उंबरपाडा गावाला तीन जल वाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण जलवहिनीच्या शेवटच्या टोकांना असणार्या घरांना, उंच आणि डोंगरी भागात असणार्या घरांना अपेक्षित दाबानं पाणीपुरवठा होत नाही. तसचं गावात बांधण्यात आलेल्या छोट्या छोट्या टाक्या वर्षानुवर्षे विनावापर पडून आहेत. त्यासाठी केलेला खर्च ही वाया जातो.सध्या प्रत्येक ठिकाणी पाणी पुरवठयासाठी मोठमोठ्या टाक्या बांधल्या जातात. त्या टाक्या भरल्या जात नाहीत, टाक्यांमधून पाणी पटकन निघून जातं, तर बऱ्याच ठिकाणी टाक्या बायपास केल्या जातात. आणि या टाक्यांमध्ये एकच आउलेट असतं त्यामुळे समान दाबानं सगळीकडे पाणी पोहचवंनं खुप अवघड होऊन जात.
त्या ऐवजी आता मुंबई आणि मद्रास आयआयटीनं मिळून एक लो कॉस्ट अल्टरनेटीव्ह सिस्टम विकसित केलं आहे. ते म्हणजे शाफ़्ट विथ मल्टीपल आउटलेट्स ( SHAFT WITH MULTI OUTLETS ) हे पहिलं इंटरवेंशन. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी उंबरपाडा गावातल्या नंदाडे आणि चाफानगर या दोन पाडयांची निवड करण्यात आली. इथं या मोठंमोठ्या टाक्यांच्या जागी एकचं शाफ़्ट ( उभी उंच वाहिनी, पाईप ) बसवण्यात आलं आहे. त्यात तीन आउटलेट्स देण्यात आलेत. त्यामुळे आता या प्रकल्पामुळे इथल्या लोकांना समान दाबानं पाणीपुरवठा होत आहे. तसचं त्यांचा वर्षानुवर्षे असलेला पाण्याच्या समस्येचा प्रश्न सुटला आहे.
ठीक ठिकाणी मोठंमोठ्या टाक्या बांधण्यासाठी अंदाजे 10 ते 20 लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र हे शाफ़्ट विथ मल्टीपल आउटलेट्स सिस्टम तयार करण्यासाठी केवळ 2 लाखांचा खर्च आला आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथल्याचं स्थानिक लोकांकडून या शाफ़्ट च्या फेब्रिकेशनचं आणि उभारणीचं काम करण्यात आलं आहे. त्यामुळे ख-या अर्थाने हा प्रकल्प गाव पातळीवर आत्मनिर्भर आहे. ठिकठिकाणी मोठंमोठ्या खर्चिक टाक्या उभारण्याची गरज नाहीये. तर उलट कमी खर्ची असे शाफ़्ट भारत भर सहजतेने उभारले जाऊ शकतात. जेणेकरून शासनाचे जे पाण्यासाठी राबवण्यात येणारे प्रोजेक्ट आहेत त्यांचे बरेच फंड देखील वाचू शकतात.
पुढे या गावातल्या इतर भागांमध्ये या सारखंचं मेनिफोल्ड आणि मास्टरपीस सारखं जे तंत्रज्ञान आहे ते वापरून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मुंबई आयआयटीच्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या टीम कडून करण्यात येणार आहे. तर यापुढे मुंबई आयआयटीच्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या मदतीनं इथं सांडपाणी व्यवस्थापणासाठी हायब्रिड ट्रीटमेंट सिस्टम देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.