पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या प्रकल्प कार्यालयात नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींसाठी २६ फेब्रुवारीला स्पर्धापरिक्षा, रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महामेळावा डहाणू नगरपरिषदेच्या बी.एस.ई.एस. हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.
डहाणू प्रकल्प कार्यालयातल्या सेवायोजन विभागात नोंदणीकृत असलेल्या अनसूचित जमातीच्या इ. १० वी पास/नापास, १२ वी पास/ नापास, डिप्लोमा, आयटीआय, बीएड, डीएड, कृषि पदवी/ पदविकाधारक, कौशल्य विकास, बॅकिंग क्षेत्रात नोकरी तसचं स्वयंरोजगार करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
अनुसूचित जमातीच्या नोंदणीकृत युवक युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचं आयोजन
या रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्यात जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या चार तालुक्यातल्या अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींनी सहभाग घेतला. यावेळी डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल, कृषि विभागाचे अधिकारी, भारतीय आर्युविमा कंपनी ( LIC ), खादी ग्रामोद्योग डहाणू, कृषि विज्ञान केंद्र कोसबाड आदी विभागाच्या प्रतिनिधीनी उपस्थित युवक आणि युवतींना मार्गदर्शन केलं.
या महामेळाव्यासाठी शासनाचे विविध 22 विभाग तसचं खाजगी कंपन्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यांच्याकडून ही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. त्यामुळे या महामेळाव्याचा सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींना फायदा होवू शकेल. कोविड – 19 च्या सर्व नियमांचं पालन करून हा रोजगार आणि स्वयंरोजगार महामेळावा पार पडला. यावेळी हजर सर्व युवक आणि युवतींचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात आलं. तसचं गर्दी टाळण्यासाठी 20-20 च्या तुकड्यांमध्ये युवक आणि युवतींना प्रवेश देण्यात आला.