पालघर / नीता चौरे : देशात सर्वत्र कोरोना महामारीनं थैमान मांडलं असून दिवसेंदिवस सर्वत्र कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येतेय. अशात आपापल्या घरातल्या, कुटुंबातल्या व्यक्तीला बरं करण्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईक मग ते ऑक्सिजन असो, रेमडेसिव्हिर इंजेक्शन असो किंवा मग प्लाझ्मा डोनर असो या सर्व गोष्टी शोधण्यासाठी धावपळ करताना दिसतायेत. खुप प्रयत्न करुन सुद्धा ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, प्लाझ्मा डोनर मिळणं कठीण होत चाललं आहे. मात्र या कठीण काळात कोरोना बाधितांच्यामदतीसाठी म्हणून प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य पालघर मधले किरण थोरात हे करत आहेत.
किरण थोरात हे पालघर च्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात क्रीडा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याना राज्य स्तरीय रक्तकर्ण या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे. कोरोनाच्या या भयान परिस्थितीत त्यांनी आतापर्यंत जवळपास 800 लोकांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. आणि या कोरोना काळात त्यांनी 16 रक्तदान शिबिरं आयोजित करून वैयक्तिकरीत्या 300 जणांना रक्त उपलब्ध करून दिलं आहे. तर या लढ्यात त्यांनी स्वतः 89 वेळा रक्तदान केलयं.
आताच्या घडीला पालघर जिल्ह्यात अडीच हजार आणि महाराष्ट्रात 25 हजार रक्तदाते आणि सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत. या कार्यातुन लोकांना जीवनदान देण्याचं एक आत्मिक समाधान मला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्यांना कोरोना होवून गेला आहे किंवा ज्यांना त्यांनी प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे त्यांनी आपला पिरियड पूर्ण झाल्यावर इतरांना प्लाझ्मा दान करण्याची विनंती थोरात यांनी लोकांना केली आहे. तसचं 18 ते 44 वयोगटाल्या तरुणांनी लसीकरणा पूर्वी शक्य तिथं जाऊन रक्तदान करावं असं आवाहन ही त्यांनी केलं आहे. कारण एकदा वैक्सीन घेतल्यानंतर 60 दिवस रक्तदान करता येत नाही. आणि भविष्यात रक्ताचा तुटवडा भासु शकतो.
किरण थोरात यांना मदतीसाठी मराठवाडा, पुणे, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणांहुन फोन कॉल्स येत आहेत. एवढेच नव्हे तर मध्यप्रदेश आणि दिल्लीहुन सुद्धा मदतीसाठी कॉल्स येत असल्याचं थोरात यांनी सांगितलं. त्यामुळे किरण थोरात यांचं कोरोना महामारीच्या काळातलं हे कार्य पाहता प्लाझ्मा उपलब्ध करून देणारा देवदूत म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.