पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर – तारापूर एमआयडीसीतल्या सिनय कंपनीच्या बाजूला मोकळया जागेत असलेल्या रबरच्या पाईपांच्या साठ्याला आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीत एक टँकर जळून खाक झालायं. मात्र यात सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आणि जवळपास पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आता अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातल्या बोईसर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या प्लॉट नंबर एन 172 मधल्या सिनय कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेत प्लास्टिक आणि रबर पासून बनलेले मोठंमोठे पाईप स्टोर करून ठेवण्यात आलेत. आणि तिथचं जवळच रोडवर एक हायड्रो क्लोरिक एसिडनं भरलेला टँकर पार्क करण्यात आला होता. त्या टँकर मधून काही केमिकल खाली असलेल्या कच-यावर पडल्यानं कच-यानं पेट घेतला. आणि त्यानंतर या पाईपांना आग लागली. याबाबत बोईसर पोलीस अधिक तपास करत आहेत.