पालघर / नीता चौरे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सफाळ्या मधल्या काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून उंबरपाडा ग्रामपंचायती अंतर्गत या भागात एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यात सौम्य लक्षण असणार-या व्यक्तींना कोरोना आजारावर प्राथमिक उपचार म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांचं एक किट देण्यात येत आहे.
सफाळे – उंबरपाडा भागांत ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला त्या दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. आणि लोकं औषधोपचारासाठी मेडिकल स्टोअर्स पर्यंत पोहचू शकत नव्हती. त्या काळात सफाळयाचं प्रगती प्रतिष्ठान, सफाळे मेडिकल एजन्सी या संस्थांनी एकत्रित येवून सफाळे ग्रामपंचायतीसाठी कोरोना आजारावर प्राथमिक उपचार म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांचं एक किट तयार केलं. आणि हे किट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्हाट्सएपची मदत घेण्यात आली. व्हाट्सएप द्वारे ग्रामपंचायत सदस्यांसाठी असलेल्या ग्रुपवर या किट बाबतचे मेसेज आणि व्हायरल करण्यात आले. आणि सद्स्यानी आपल्या अनेक ग्रुप मध्ये हे मेसेज व्हायरल केले. जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली.
आणि मग उंबरपाडा ग्रामपंचायतीकडून 25 ग्रामपंचायतीना या औषधांच्या किट देण्यात आल्या. या 25 ग्रामपंचायती मार्फ़त आतापर्यंत सौम्य लक्षण असलेल्या किंवा गृहविलगीककरणात असलेल्या जवळपास 700 ते 750 लोकांपर्यंत हे पाच ते सात दिवसांचं औषधांचं किट पोहचवण्यात आलं आहे. यासाठी एक फॉर्म त्या लोकांकडून भरून घेण्यात येतो. त्यात त्यांचा आधारकार्ड क्रमांक आणि मोबाईल यासारखी माहिती घेतली जाते. जेणेकरून त्या व्यक्तीची नोंद ठेवून त्याच्या तब्येती बद्दल विचारणा करता येईल. जर हे औषध घेउन फरक न पडल्यास त्या व्यक्तीला पुढे कोविड केअर सेंटर, पालघर ग्रामीण रुग्णालय किंवा जवळच्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये पाठवलं जातं.
त्याच्या परिणाम स्वरूप या भागातल्या रुग्ण संख्येत घट झाली असल्याची माहिती ग्रामपंचायती च्या सदस्या तनुजा तरे यांनी दिली आहे. तसचं पुढील काळात जर कोरोनाची तीसरी लाट आली तर त्या पासून वाचण्यासाठी देखील याचा उपयोग होवू शकेल असं ही त्या म्हणाल्या.